आजरा कारखान्याची निवडणूक जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर – आजरा तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाआहे. १७ डिसेंबर रोजी मतदान तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळांची मुदत मे २०२१ मध्ये संपली आहे. मात्र, कोरोना व इतर विविध कारणांनी संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने २ मे रोजी प्रारूप मतदार यादी तर २५ मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली होती. यामुळे निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती मिळाली. या स्थगितीची मुदत नुकतीच पूर्ण झाली आहे.

एकूण २१ जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तूर-मडिलगे, आजरा श्रृंगारवाडी, पेरणोली-गवसे, भादवण-गजरगाव, हात्तीवडे- मलिग्रे या पाच उत्पादक सभासद गटांतून प्रत्येक तीन असे १५ संचालक निवडले जाणार आहेत. महिला प्रतिनिधी गटातून दोन तर ब वर्ग व्यक्ती सभासद, अनुसूचित जाती, इतर मागास वर्गीय व भटक्या विमुक्त जाती या चार गटांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. पत्रकात आलेल्या संभाव्य कार्यक्रमानुसार ६ ते १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरणे, १६ नोव्हेंबर रोजी छाननी, १ डिसेंबरपर्यंत माघार, ४ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप, १७ डिसेंबर रोजी मतदान तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी असा जाहीर करण्यात आला आहे.
आजरा शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील आजऱ्यांच्या सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय हे कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय राहणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »