त्यांचा खासगी व्यवस्थित, मात्र त्यांनीच तुमचा ‘घोडगंगा’ बंद पाडला
अजितदादांची आ. अशोक पवारांवर जोरदार टीका
पुणे – ‘अविवाहित मुलाला कारखान्याचा अध्यक्ष करू नको, असा सल्ला मी तुमच्या आमदारांना (आ. अशोक पवार) वेळोवेळी दिला होता. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. पर्यायाने कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी मात्र आपला खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली, अशी जळजळीत टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. अशोक पवार यांच्यावर केली.
माझ्या सांगण्यावरून त्यांना तुम्ही मते दिलीत. मात्र आमदारांनी कारखान्यात लक्ष न दिल्याने घोडगंगा कारखाना बंद पडला. यातच माझी खरी चूक झाली, असे प्रतिपादनही अजितदादा यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. त्यासाठी फक्त तुम्ही मला साथ द्या. आम्ही सोडून घोडगंगा कारखाना कुणीही चालू करून दाखवावा. मंत्रिमंडळात सर्व खाती आमच्याकडे असल्याने तो फक्त आम्हीच चालू करू शकतो. असे खुले आवाहनी अजित पवार यांनी दिले.
पवार म्हणाले, विद्यमान संचालक मंडळाला घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो.
आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र, ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.