अनुराज शुगर्सच्या ८४ कामगारांना रूजू करून घेण्याचे आदेश

अजित पवार यांची मध्यस्थी
पुणे : अनुराज शुगर्सच्या कमी केलेल्या ८४ कामगारांना कामावर रूजून करून घेण्याचा आदेश कामगार आयुक्तांनी दिला आहे. हे प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत अपर कामगार आयुक्तांशी संपर्क साधला होता.
भीमा साखर कामगार संघटनेचे ८४ कामगार कामावर हजर असताना देखील त्यांना नोटीस न देता कामावरून हाकलून दिल्याची तक्रार होती. भिमा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरात यांनी ८४ कामगारासह अनुराज शुगर्स कारखाना गेट समोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या वैशालीताई नागवडे यांनी कामगारांची धरणे आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी तत्काळ अपर कामगार आयुक्त पुणे यांच्याशी संपर्क करुन आयुक्तांशी चर्चा केली.
अपर कामगार आयुक्त (पुणे विभाग) यांच्या समोर १४ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यवस्थापना तर्फे टाईमकिपर उपस्थित होते. मात्र अनुराज शुगर्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी अनुराज शुगर्स कारखाना व्यवस्थापक विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भिमा साखर कामगार संघटनेच्या ८४ कामगारांना तत्काळ कामावर घेणे बाबत पत्राद्वारे अनुराग शुगर्स कारखाना प्रशासनाला सुचित करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रक़रणी पुन्हा येत्या २५ सप्टेंबर रोजी अपर कामगार आयुक्तांकडे बैठक करण्यात आली आहे. अनुराज शुगर्स कारखाना व्यवस्थापकांनी कागदपत्र अभिलेख अधिकार पत्रासह स्वतः उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागवडे यांचे भीमा साखर कामगार संघटनेचे (अध्यक्ष) सचिन थोरात. (उपाध्यक्ष) कैलास दौंडकर (सेक्रेटरी) अनिल थोरात (खजिनदार) संदीप खेडेकर व सभासद कामगारांनी आभार व्यक्त केले.