ऊसतोड मजूर दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा

उमरखेड: बिटरगाव (खु.) शिवारात थकीत कर्जाच्या वादातून एका मुकादमासह त्याच्या साथीदारांनी ऊसतोड मजूर आणि त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.चिल्ली (ता. उमरखेड) येथील रहिवासी शेख रहीम शेख खाजा (२७) हे गेल्या पाच महिन्यांपासून हडसणी येथील मुकादम शेख अकबर शेख रमजान याच्या टोळीत ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. मजुराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घेतलेली ३० हजार रुपयांची उचल (अॅडव्हान्स) कामाद्वारे पूर्णपणे फेडली होती. मात्र, मुकादमाने हैदराबाद येथून आणण्यासाठी लागलेले अतिरिक्त ९ हजार रुपये थकीत असल्याचे सांगून रहीम आणि त्यांच्या पत्नीला मंगळवारपासून डांबून ठेवले होते.
गुरुवारी सायंकाळी हे दाम्पत्य किराणा सामान आणण्यासाठी गावात जात असताना मुकादमाने त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात मुकादम शेख अकबर (४२) आणि शेख अहेमद (४०) यांनी रहीम यांच्या डोक्यावर लाकडी काठीने जोरदार प्रहार केला. त्याचवेळी आयेशा अकबर शेख (३७) आणि शम्मा अहेमद शेख (३५) यांनी रहीम यांची पत्नी सलमा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलीस कारवाई या घटनेची माहिती तातडीने ‘डायल ११२’ वर देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उमरखेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.






