‘बारामती ॲग्रो’ कारखान्याची चौकशी : सहकारमंत्री

सावे – राम शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात विलंब झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केला. यावरून शिंदे आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शेवटी या कारखान्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सावे यांनी केली.
खासगी साखर कारखाने कंपनी कायद्यानुसार चालतात, त्यावर सहकार खाते कारवाई करू शकते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिंदे यांनी लक्षवेधी प्रस्तावाद्वारे, रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती अॅग्रो लिमिटेड या साखर कारखान्यावर महाराष्ट्राचे साखर आयुक्त कोणतीही कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
“इंदापूरस्थित बारामती अॅग्रो लिमिटेडने 15 ऑक्टोबरच्या नियोजित तारखेपूर्वी गाळप सुरू केले होते, त्याला आमदार शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. गुरुवारी त्यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. अनेक तक्रारी करूनही साखर आयुक्तांनी कारखान्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असे शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
सावे यांनी उत्तरात सांगितले की, या साखर कारखान्याविरोधात आवश्यक कारवाई केली जाईल. त्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध आधीच एफआयआर दाखल आहे.
साखर आयुक्तांनी कारखान्यावर कारवाई करायला पाच महिने लावले, असा आरोप करून शिंदे म्हणाले की, एवढ्या उशिरा कारवाई करण्यात अर्थ नाही.
त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच साखर आयुक्त आणि सहकार विभागाने कारवाई केली, असे शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी एफआयआर आणि तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
सावे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असता, शिंदे यांनी कारखान्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा पुनरुच्चार करत सावे यांना मध्येच अडवले आणि अशा विलंबासाठी साखर आयुक्तांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी केली.
सावे आणि शिंदे यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाला. साखर आयुक्तांच्या सहभागाशिवाय साखर आयुक्तालय या प्रकरणाची चौकशी करेल, असे सावे यांनी नंतर सांगितले.
[…] […]