प्रतिटन 5,500 रु. दर द्या : रयत क्रांती
बेळगाव – ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. त्यासाठी बेळगावातील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते.
या आंदोलनामुळं पोलिसांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना लोटला तरी शेतकऱ्यांसह रयत संघटनेच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सहकारमंत्र्यांनी कारखानदारांना दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असे आदेश देऊनही कारखानदारांनी याकडं दुर्लक्ष करत गळीत हंगाम सुरुच ठेवला आहे.
तसेच राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या साखर कारखानदारांनी ऊस दरप्रश्नी मौन बाळगलं असल्याचा आरोप रयत संघटनेतर्फे करण्यात आला आहे.