माझ्याशिवाय खात्रीचे उत्पन्न देतो कोण?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्री. भास्कर घुले

मी साखर कारखाना बोलतोय या मालिकेतील चौथा भाग

ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री. भास्कर घुले यांच्या लेखणीतून तो बोलू लागला आणि ग्रामीण अर्थक्रांतीची कहाणी सांगू लागला. साखर उद्योगाचा महिमा असा झाला होता की, अनेकांनी सरकारी नोकर्‍यांऐवजी साखर कारखान्यांतील नोकरीला प्राधान्य दिले..

हा बदल माझ्यामुळे झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. बागायत क्षेत्र वाढले सिंचनाच्या सुविधा वाढल्या उसाचे उदंड पीक येऊ लागले प्रति टन शेकड्यात मिळणारा ऊस दर हजारात मिळू लागला.

ऊस पिकाऐवजी इतर पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना कधी लॉटरी लागल्याप्रमाणे प्रचंड दर मिळतो. तर कधी उत्पादन खर्चही निघत नाही. लाखोंनी खर्च करायचा आणि उत्पन्न मात्र हजारात घ्यायचे अशी अवस्था बर्‍याच वेळा इतर पिकांची झाल्याचे तुम्ही पाहत असताच.

माझे मात्र तसे नाही. माझ्याकडे ऊस आणल्यास शाश्वत उत्पन्न मिळते. ते किती कमी-जास्त हा तुलनेचा भाग वेगळा. कितीही वाईट प्रसंग आला, तरी किमान केलेला खर्च तरी 100% निघतो. इतर वेळी चांगला मोबदला मिळतोच, मिळतो.

शेतकर्‍याची जी प्रगती झाली आहे, ती माझ्यामुळे झाली हे कोणालाही नाकारता येणार नाही. मी फक्त शेतकर्‍याची प्रगती करून थांबलो नाही, तर माझ्यामुळे संपूर्ण परिसराचादेखील विकास झाला. दळणवळणाची साधने तयार झाली. पूर्वी एका घरात एक वाहन असायचे, आज शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतःची बाईक तरी आहे, शिवाय अनेकांकडे बाईक अन् चारचाकी गाडीही आहे.

आर्थिक उन्नतीसोबत गरजाही वाढल्या
जशी शेतकर्‍याची आर्थिक उन्नती झाली, तसे त्याच्या गरजा वाढत गेल्या. एखाद्या ड्रेसवर भागवणारे शेतकर्‍याच्या घरातील सदस्य आज वर्षाला डझनाने ड्रेस, चपला घेऊ लागलेत. शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. शेतकर्‍यांच्या मुलाचा पॉकेट मनी वाढू लागला. शेतकरी कुटुंबांची क्रयशक्ती वाढल्याने एकूणच अर्थकारणाला गती मिळाली. शेतीखेरीज इतर क्षेत्राचाही फायदा माझ्यामुळे होऊ लागला. गावात-परिसरात विविध दुकानांची, हॉटेलांची संख्या वाढली.

परिस्थिती बदलत गेली तशी एकत्र कुटुंब व्यवस्था सुद्धा मोडीत निघू लागली. स्वतंत्र कुटुंब व्यवस्था उदयास आली. त्यामुळे शेतीचे तुकडे वाढले. शेतकर्‍यांची प्रतिडोई शेतीक्षेत्र कमी झाले. पूर्वीच्या काळी उत्पन्न कमी असूनही गरजा कमी असल्यामुळे शेतकर्‍याचं ‘बॅलन्स शीट प्रॉफिट’ मध्ये होते. ते आता उत्पन्न वाढूनही, गरजा वाढल्यामुळे ‘लॉस’ मध्ये जायला सुरुवात झाली. त्यातच कारखान्यांची संख्या वाढली आणि शासनाने झोनबंदी उठवली. झोनबंदी उठवल्यामुळे शेतकरी जो कारखाना जास्त भाव देईल त्या माझ्या बांधवांकडे ऊस द्यायला स्वतंत्र झाला.

आतापर्यंत माझ्यामुळे झालेली शेतकर्‍यांची प्रगती शेतकरी विसरू लागला. त्यात शेतकर्‍याचा दोष नाही. देशामध्ये मजूरांपासून कारखानदारांपर्यंत आणि शिपायापासून सचिवापर्यंत, सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत, तसेच टपरीधारकापासून ते मॉलपर्यंत सर्वांनीच प्रगती केली. मग शेतकर्‍यांनी मागे का राहावे?
टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी अल्प काळाकरता का होईना हजारच्या भावाने टोमॅटो क्रेटची विक्री केली. टोमॅटोचा भाव किलोला दोनशे रुपयांच्या पुढे गेला म्हणून टाहो फोडणारा ग्राहक. आज शेतकर्‍याची टोमॅटो रुपया किलोने घ्यायला सुद्धा तयार नाही. शेतकर्‍यावर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. अशा अस्थिर शेती व्यवसायामध्ये मी शेतकर्‍याला कधीही वार्‍यावर सोडलेले नाही. माझ्यापासून शेतकर्‍याला थोडेसे कमी का असेना; पण निश्चित मिळेल. ते शाश्वत आहे.

एफआरपी ठरला वरदान
काही वर्षांपूवीर् ‘एफआरपी’सारखा कायदा आला. तो शेतकर्‍यांसाठी वरदानच ठरला. पूर्वी शेतकर्‍याचा ऊस कारखान्यात आल्यानंतर कारखान्यात होणारे सर्व खर्च वजा जाता उर्वरित पैसा शेतकर्‍यांना ऊस दराच्या रूपाने अदा केला जायचा. आता मात्र एफआरपीचा कायदा आल्याने, सर्वप्रथम शेतकर्‍याच्या ऊसाला ठरवून दिलेला हमीभाव आधी अदा करायचा, मग उरलेल्या पैशातून कारखान्याने इतर खर्च भागवायचे.
हे करत असताना बर्‍याच वेळा माझ्यासाठी कसरतीचा काळ येत असे. माझ्याबाबत कितीही काटकसर केली, तरीदेखील येणारे उत्पन्न आणि उसाचा दर याच्यात तफावत राहते आणि मग सरकार विविध योजनांद्वारे कर्जरुपाने पैसे उपलब्ध करून देते; पण शेतकर्‍यांना त्यांचा हमीभाव द्यावाच लागतो. परिणामी माझा संचित तोटा निश्चितपणाने वाढतो.

साखरेचे दर व इतर उत्पन्न कमी असताना तोटा सहन करून शेतकर्‍यांना भाव दिला जातो आणि ज्या वेळेला थोडेसे उत्पन्न वाढते आणि शेतकर्‍यांना ऊस दर देऊनही काही पैसे शिल्लक राहतात, त्यावेळेला शेतकरी एफआरपीपेक्षा जास्त दराची अपेक्षा करतो.
मागील तोटा कसा भरून काढायचा हा प्रश्न माझ्यासमोर काही उभा राहतो. यात शेतकर्‍याचे यत्किंचितही चुकत नाही आणि माझी त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, कारण माझे प्रथम प्राधान्य शेतकरी आहे. शेतकर्‍यांनी ऊस पिकवला तरच माझी चाके फिरतील. शेतकरी वजा केला, तर माझे वेगळे अस्तित्व शिल्लक राहत नाही. शेतकर्‍याला जास्तीत जास्त उत्पन मिळावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.
मी जसा शेतकर्‍यांचा विचार करतो, तसा शेतकर्‍यांनीही माझा विचार करावा आणि हा कारखाना माझाच आहे हा टिकला तर मी टिकेन ही भावना मनामध्ये जोपासावी. माझे चुकत असेल तर मला शिक्षा निश्चितपणे द्यावी. आपण दोघांनीही हातात हात घालून मार्गक्रमण केले पाहिजे. मला तोटा सहन करायला लावून जास्त दराची अपेक्षा केली, तर मात्र आपल्या दोघांचेही नुकसान होणार आहे. म्हणून मला शेतकर्‍यांकडून काही अपेक्षा आहेत.

शेतकर्‍यांकडून माझ्या अपेक्षा
माझा आत्मा हा शेतकरी असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या उसाला कमी भाव देता कामा नये. माझ्या चालकांनी काटकसरीने मला चालवावे आणि जास्तीत जास्त शेतकर्‍यांच्या पदरात द्यावे ही माझी मनोमन इच्छा आहे; परंतु शेतकर्‍यांनीदेखील ऊस शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. शेतकर्‍यांची ‘लँड होल्डिंग’ कमी झाल्यामुळे आता क्षेत्र वाढणार नाही.
म्हणून प्रत्येक शेतकर्‍याने कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन कसे करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. एकरी उत्पन्न वाढवत असताना उसावरील खर्च वाढू न देता कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून उसाचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि एकरी उत्पन्न वाढविले पाहिजे.

आज माझ्या कार्यक्षेत्रात अनेक शेतकरी असे आहेत की जे एकरी शंभर टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतात. सर्वांना शंभर टन शक्य नसले तरी किमान सरासरी एकरी उत्पन्न 80 टनांपेक्षा कमी राहणार नाही याची शेतकर्‍यांनी दक्षता घ्यावी. एफआरपी सारखा कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी देखील तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात जर तुमचे एकमेव उत्पन्न वाढले तर माझ्या काही कारणामुळे आजारपणांमध्ये थोडेफार इकडे तिकडे झाले तर तुमचे उत्पन्न कमी होणार नाही.

काही बाबतींमध्ये माझी मशिनरी जुनी झाली आहे. काही ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर करून माझ्या मशिनरीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकर्‍यांनी देखील हा कारखाना माझा आहे ही भावना जोपासावी. सध्या काळ बदलतोय इथेनॉल, कोजन व इतर उपपदार्थांमुळे मला चांगले दिवस येणार आहेत. मी निश्चितपणे सक्षम होणार आहे. मी सक्षम झालो की, शेतकर्‍यांना एफ.आर.पी. पेक्षाही जास्त भाव देऊ शकेन. पण मला सक्षम होण्यासाठी फार नाही पण थोडीशी उसंत सभासद व ऊस उत्पादकांनी द्यायला हवी असे माझे प्रांजल मत आहे. याचा अर्थ तुम्ही कमी भाव घ्यावा, असे मी अजिबात म्हणणार नाही; परंतु चढाओढीमध्ये मी कमकुवत होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे.

सभासद, ऊस उत्पादक मायबाप
सभासद व ऊस उत्पादक शेतकरी हे माझे मायबाप आहेत. मी ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलाय, त्याचप्रमाणे आता तुम्हीदेखील माझ्यामध्ये काही बदल घडवून आणताना सहकार्य मात्र केले पाहिजे. तुम्ही स्वतःचे नुकसान करून माझ्यासाठी योगदान द्यावे ही माझी मुळीच इच्छा नाही; परंतु मीदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम राहील यासाठी तुम्ही काही ना काही केले पाहिजे. मला दोष देणे. माझ्यावर आगपाखड करणे व मला बदनाम करणे या गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात कारण माझा जन्मच शेतकर्‍यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी झाला आहे हे मी आजपर्यंत सिद्ध केले आहे आणि इथून पुढे देखील करणार आहे.

राजकारणापायी माझा बळी जाईल आणि मी उद्ध्वस्त होईन असे कोणतेही कृत्य शेतकरी कधीच करणार नाही, याची मला खात्री असली, तरी देखील माझ्या बाबतीत काही अफवांना बळी न पडता तुम्ही सदैव माझ्यासाठी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहाल, ही अपेक्षा मात्र मी कायम बाळगून आहे.

आजच्या काळातला शेतकरी अतिशय सुज्ञ आणि व्यावहारिक झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान त्याच्याकडे उपलब्ध आहे; पण त्या ज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी करावा ही माझी माफक पेक्षा आहे. शेतकर्‍यांनी माझ्याकडून नेहमी अपेक्षा ठेवाव्यात, यात गैर काही नाही आणि मलाही त्याचं काही वाटत नाही; परंतु या स्पर्धेच्या काळामध्ये शेतकरी हाच माझा मालक आहे याची पूर्ण जाणीव मला आहे. काही चुकत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे बोट ठेवले पाहिजे. – क्रमश:


(लेखक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.)
कृपया आपल्या प्रतिक्रिया व्हॉट्‌सअप क्रमांकावर पाठवा (८९९९७७६७२१)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »