साखर उद्योगाला समर्पित व्यक्तिमत्व : भास्कर घुले (वाढदिवस विशेष)
वाढदिवस विशेष
अनेक पुरस्कारप्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख ते ‘शुगरटुडे’चे नियमित लेखकही आहेत. त्यांचा ‘मी साखर कारखाना बोलतोय’ हा स्तंभ लोकप्रिय झाला आहे.
श्री. भास्कर घुले म्हणजे साखरेपेक्षा गोड व्यक्तिमत्त्व, तरी प्रसंगी उसापेक्षाही कडक! उसाच्या रसाप्रमाणे प्रवाही आणि उसाप्रमाणेच बहुपयोगी, बहुगुणी. साखर उद्योगाला समर्पित नेतृत्व.
ते नेहमी कारखान्याच्या नियमित व्यवस्थापनात गुंतलेले असतात व संस्थेचे पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करतात अचूक निर्णय क्षमता ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
अतिशय ज्ञानी आणि प्रज्ञावंत असलेल्या या व्यक्तिमत्वाचा दिवस पहाटे 4.30 वाजता सुरू होतो. प्रामाणिकपणा, चिकित्सक वृत्ती, गरजूंना मदत हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. ते उत्तम वक्तादेखील आहेत. त्यांनी प्रथमतः सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला. आणखी शिकायची ऊर्मी होती, प्रबळ इच्छा होती. मात्र अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल ओव्हरसियर म्हणून काम सुरू केले.
कामाप्रति असलेली निष्ठा आणि रात्रंदिवस वाहून घेण्याच्या वृत्तीमुळे श्री. घुले हे व्यवस्थापन मंडळाच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांना नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल इंजिनिजर म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून रुजू झाले आणि कामाचा झपाटा, निर्णयक्षमता या गुणांमुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरले.
आणखी शिकण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती, नोकरी करत करत ते इंग्रजी विषयामध्ये बीए झाले आणि एमबीएची पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे कार्यकारी संचालकाची परीक्षाही ते अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्येच त्यांना कार्यकारी संचालक म्हणून संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले.
सतत कार्यमग्न राहणे हे त्यांचा आणखी एक गुण. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नाहीत. त्यामुळे आजार वगैरे त्यांच्या जवळपास फिरकत नाहीत. त्यांचे पहिले प्राधान्य कर्तव्य आणि नंतर कुटुंब आहे. कार्यमग्नता हे त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून व्यसनच जणू बनले आहे. अशक्य किंवा नाही हा शब्द त्यांच्याकडे नाहीतच.
सकारात्मक विचार करुन हाती घेतलेले काम पूर्ण झालेच पाहिजे हा त्यांचा ध्यास असती. हा कारखाना माझा आहे आणि त्याप्रति माझी सर्वोच्च जबाबदारी आहे या भावनेतून ते कामामध्ये झोकून देऊन ते दिवस-रात्र मेहनत करतात. व्यवस्थापनातील अशक्य असणार्या गोष्टी शक्य करुन दाखविण्यात ते वाक्बगार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेले आहे, त्या-त्या विकाणी अतिशय विश्वासाने, प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे, प्रचंड कष्टाने त्यांनी काम केलेले आहे.
हे सर्व करत असताना ते वडीलधारी मंडळी व ज्येष्ठांचा सदैव सन्मान करतात. परिस्थिती कोणतीही असो पण कामगारांना बोनस दिलाच पाहिजे, त्या शिवाय माझी दिवाळी गोड होणार नाही यासाठी ते आग्रही असतात. आपला साखर कारखाना ही लाखों जनांची जननी आहे, माता आहे आणि त्या मातेची आपण सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. या मातेच्या अस्तित्वासाठी आपण झगडले पाहिजे, जेणेकरुन त्या जननीच्या माध्यमातुन हजारो कुटुंबे आनंदी आयुष्य जगतील, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
व्यक्तिगत आयुष्यात श्री. घुले खूप कुटुंबवत्सल आहेत. संपूर्ण परिवाराचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा विद्यादानाचे कार्य करतात. म्हणजे शिक्षिका आहेत. त्यांची मुले श्रद्धा आणि शुभम यांनी वडिलांचा कार्य संस्कारांचा वारसा पुढे खूप चांगल्या पद्धतीने चालवला आहे. किंबहुना दोन्ही मुले वडिलांपेक्षा काही पावले पुढेच आहेत. कन्या श्रद्धा या आंतरराष्ट्रीय खेळाडू असून, गुजरात स्पोर्ट्स अकादमीमध्ये कोच आहेत, तर जावई रवींद्र ज्ञानेश्वर खताळे आयएएस अधिकारी असून, गुजरातमधील सोमनाथ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
चिरंजीव शुभम हे निमाई डेअरी फार्म लि. या नामवंत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. स्नुषा डॉ. विनिता या वैद्यकीय सेवेत आहेत.
(‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने श्री. भास्कर घुले यांना खूप खूप शुभेच्छा!)
असे आहे कर्तव्यनिष्ठ श्री. भास्कर घुले यांच्या जीवनाचे सूत्र
- : कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. याची जाणीव मला जीवन जगत असताना झाली त्यामुळे या वयात देखील माझा दिवस होतो, तो भल्या पहाटे म्हणजे, 4.30 वाजता आणि संपतो रात्री 10.30 वाजता, रोज साधारणतः सकाळी दोन तास चालणे, थोडा व्यायाम, योगासने व ध्यानधारणा करणे या गोष्टींपासून माझी दिनचर्या सुरू होते व हे सर्व करुन कारखान्यात इतर सर्वांच्या आधी माझे ऑफिस काम चालू झालेले असते.
- कारखान्यातील काम सुरळीत पार पाडण्यासाठी खातेप्रमुख व विभागप्रमुख यांची दर आठवड्याला कामकाजा विषयी समन्वय बैठक घेण्यात येते, सर्व विभागप्रमुखांच्या मतांचा व सूचनांचा आदर करुन खुली चर्चा करुन सर्व विभागांना समान न्याय व वागणूक देण्यावर माझा भर असतो.
- कारखान्यात काम करणारे ऊसतोडणी मजुर, ट्रक ड्रायव्हर, तोडणी/वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे कामगार, तसेच अधिकारी व सर्व संचालक मंडळ या सर्वांना बरोबर घेऊन चालणारे कारखान्याचे चेअरमन साहेब यांचे सर्वांबरोबर कारखान्याच्या कामकाजाच्या दृष्टीने माझे अत्यंत सलोख्याचे व प्रेमाचे नाते झाले आहे.
कारखान्याचे लोकप्रिय चेअमरन श्री. सत्यशील शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले सुविधा प्रकल्प
- कारखान्यामध्ये नव्याने स्मार्ट शेतकरी कार्ड, स्मार्ट कर्मचारी कार्ड, स्मार्ट संचालक कार्ड, डिजीटल नंबर ट्रॅकिंग सिस्टिम, शेतक-यांसाठी अॅप सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे कारखान्याचे कामकाज मोठ्या प्रमाणात पेपरलेस झालेले आहे.
- : कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाखालील क्षेत्र वाढविणे बरोबरच कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु करुन ऊसाची एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस विकास योजनांना प्राधान्य दिले. त्यामध्ये प्रामुख्याने मुलभूत व प्रमाणित बियाणे शेतकर्यांना उधारी तत्वावर वाटप केले व रोप लागवडीवर भर देऊन रासायनिक खताबरोबरच, जैविक खतांचे महत्व शेतकर्यांना पटवून दिले. कारखाना कार्यस्थळावर जैविक खत निर्मिती प्रकल्प व माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु केली
- -: ऊसतोडणी मजुरांच्या समस्येवर उपाय म्हणुन 15 ते 20% ऊसाची तोडणी हार्वेस्टर मशिनचे सहाय्याने करण्यावर भर दिला. ऊसतोडणी मजुरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देऊन, त्यांच्यासाठी विमा संरक्षणा बरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन, आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन) व कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.
- आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना, ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान या गोष्टींवर भर दिला. चांगली रिकव्हरी मिळविण्यासाठी मिल, बॉयलर, टर्बाईन, बॉयलिंग हाऊस, पॅन सेक्सन, शुगर हाऊस याकडे जातीने लक्ष दिले. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत यंत्र सामुग्रीचा वापर केला:
जगद्गुरू श्री संत तुकोबा रायांच्या ‘आधी केले, मग सांगितले’ या अभंगानुसार जीवनात अमूलाग्र स्वरूपाचे बदल करुन त्याप्रमाणे प्रामाणिक जीवन जगण्याचा माझा प्रयत्न आहे.