‘भोगावती’ निवडणूक बिनविरोध होत असेल, तर सहकार्य: धैर्यशील पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याची आगामी निवडणूक सन्मानाने बिनविरोध होत असेल, तर आम्ही पूर्ण सहकार्य करू असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी केले. कौलव परिसरात शेतकरी सभासद जनसंवाद दौऱ्यात ते बोलत होते.
या दौऱ्यात त्यांनी घोटवडे, ठिकपुर्ली, बरगेवाडी, भोपळवाडी, आमजाई व्हरवडे या गावांतील सभासदांशी संवाद साधला. आपला कारखाना आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे मदतीची तयारी आहे, अन्यथा निवडणूक लढविणारच, असा इशारा त्यांनी दिला.

धैर्यशील पाटील म्हणाले, कारखाना बंद पडल्यास सर्वजण अडचणीत येतील. जवळपास ३२ हजार सभासद शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी हे कारखान्यावर अवलंबून आहेत. म्हणून या निवडणुकीत कारखाना वाचवण्याची भूमिका आम्ही मांडली आहे. मात्र, तसेच झाले नाही तर भोगावती साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी जे सोबत येतील, त्यांना घेऊन मी कारखान्याची निवडणूक लढवणार आहे.

पाटील म्हणाले की, दिवंगत दादासाहेब पाटील यांनी, ज्या चांगल्या हेतूने साखर कारखान्याची स्थापना केली, तो हेतू बाजूला पडल्याचे दिसत आहे. कारखान्यातील कामगारांचे पगार, शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देवून कारखान्याला कर्जमुक्त करून गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी सभासदांनी आम्हाला साथ द्यावी. यावेळी भगवान देवकर, संजय डोंगळे, प्रा. निवास पाटील, तानाजी ढोकरे, विश्वास पाटील, आप्पासाहेब हजारे, शहाजी पाटील, आशितोष पाटील, वसंतराव कुलकर्णी, सुनील पाटील, शिवाजी पारखे, संजय पाटील आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »