शेतकऱ्यांसाठी सुसज्ज मॉल उभा करणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सीए सचिन घायाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या विजयाचे श्रेय सभासदांना असून कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विकासासाठी ऊस गाळप क्षमता वाढवून शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा केंद्र, सुसज्ज मॉलची शहरात उभारणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजनांसह प्रकल्प उभारण्याचा आपण मानस असून कारखान्याचा विकास व शेतकरी, कामगारांना सक्षम करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे ‘सीए’ सचिन घायाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर एकहाती सत्ता आणल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सचिन घायाळ यांनी कारखान्याच्या विकासाबाबत मत मांडले. कारखान्याची साईट उत्तम असून ऊसाची मुबलकता आहे. कारखान्यावर अनेक राजकीय नेते मंडळींनी सत्ता भोगली. कारखान्याच्या विकासाकडे मात्र सर्वांनी दुर्लक्ष केले असल्याचे घायाळ यांनी सांगितले.

कारखान्याचा विकास होऊन ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे, यासाठी गाळप क्षमता वाढवून विविध विकासाला पुरक ठरणारे शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उसाचे सुधारीत बेणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आपण उपलब्ध करुन देणार आहे. तसेच शेतीसाठी दर्जेदार औषधी व खते उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी सेवा केंद्र सुरु करणार आहे. तसेच शहरात सुसज्ज मॉलची उभारणी करण्याचा आपला मानस असून शेतकरी, सभासद व कामगार यांचा विकास साधला जाईल. असेही घायाळ यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »