एमएसपी वाढवण्यावर विचार करणार : केंद्रीय मंत्री जोशी

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याची मागणी सातत्याने साखर उद्योगाकडून केली जात आहे; आम्ही त्यावर विचार करत आहोत. असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
इस्माने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेचा विक्री दर प्रति किलो ४० रुपये करण्याची मागणी केली आहे, तर विस्माने रू. ४२ दर करण्याचा आग्रह धरला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचाही त्यासाठी आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर जोशी म्हणाले, निर्यातीचा साखरेच्या दरावर होणाऱ्या परिणामाचे मंत्रालय मूल्यांकन करेल आणि त्यानंतर किमान विक्री दर वाढवण्याच्या मागणीचा विचार करेल.
२०१९ च्या फेब्रुवारीपासून साखरेची किमान विक्री दर ३१ रुपये कायम आहे. त्यामुळे उद्योगाकडून साखरेच्या दरात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या २०२४-२५ हंगामात, आम्ही १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिल्यानंतर किमती स्थिर होत्या. आम्ही अलीकडेच २०२५-२६ हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे, असे जोशी यांनी सांगितले.
इस्मानेसाखर उद्योगाच्या अडचणी मांडत साखरेच्या विक्री दरात वाढ करण्याची शिफारस केली आहे. उसाची एफआरपी २९ टक्क्यांनी वाढून २०२५-२६ मध्ये प्रति क्विंटल ३५५ रुपये झाला आहे. यामुळे साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. साखरेच्या उत्पादनाचा खर्च आता प्रति किलो ४०.२४ रुपये इतका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२५-२६ साठी साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करून ४०.२ रुपये प्रतिकिलो करावा, अशी मागणी केली आहे.
तसेच भविष्यात जोखीम टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर देयक जमा करण्यासाठी सरकारने एआरपी-एमएसपी लिंकेज यंत्रणा संस्थात्मक करावी अशी शिफारसही केली आहे.






