स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेची सांगता

कोल्हापूर : कारखान्याकडून पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपी मिळावी यासाठी शुक्रवारपासून (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारी (ता. १५) झाली. या वेळी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, यशोधन शिंदे-नेसरीकर, आनंदराव कुलकर्णी, सुभाष पाटील, धनाजी पाटील, अशोक पाटील, सखाराम केसरकर, वसंत पाटील, गोपाळ मरबसवन्नावर, प्रभू वंटमोरी, प्रकाश मुरकुटे, अनिल कोकितकर, अजित तुरटे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. …तर
कारखान्यांवर आंदोलन करणार : शेट्टी
याप्रसंगी शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन ३५०० रुपयांवर पहिली उचल जाहीर केली; मात्र गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील कारखानदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. येत्या शनिवारपर्यंत ३५०० रुपयांवर पहिली उचल जाहीर केली नाही, तर रविवारपासून (ता. २३) त्या कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल ३६०० रुपये ही मागणी रास्तच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारी सदृढ झाली आहे, त्यामुळे आमची ही मागणी मान्यच करावी लागेल. उसाला पहिली उचल ३६०० दिली नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी एकजुटीची ताकद कारखानदारांना दाखवून देऊ, असे ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले.






