इथेनॉल विक्रीत विक्रमी वाढ; धान्याचा वाटा ७६ टक्के

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असून, चालू इथेनॉल पुरवठा वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत तेल विपणन कंपन्यांनी तब्बल ८०० कोटी लिटर इथेनॉल वितरित केले आहे. यातील सुमारे ७६ टक्के इथेनॉल धान्यापासून तयार करण्यात आलेले असल्याची माहिती ‘ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन’ने दिली आहे.

जून महिन्यात धान्यापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वाटा सुमारे ७१ कोटी लिटर इतका होता. जूनमध्ये एकूण १०३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ७५ कोटी लिटर इथेनॉल धान्यावर आधारित होते. त्यामुळे मासिक पुरवठ्यात धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वाटा सातत्याने वाढताना दिसत आहे.

‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडील (एफसीआय) अतिरिक्त धान्याचा वापरही इथेनॉल निर्मितीसाठी केला जात आहे. जूनमध्ये मका आणि धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वाटा प्रत्येकी सुमारे ३० कोटी लिटर होता. उर्वरित पुरवठ्यात इतर कच्च्या मालाचा समावेश होता.

खराब धान्यापासूनही इथेनॉल निर्मिती

एफसीआयकडील खराब झालेल्या अन्नधान्यापासूनही मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार केले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, या माध्यमातून सुमारे ११ कोटी लिटर इथेनॉल मिळाले आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये उसापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वाटा कमी झाला असून, धान्याधारित इथेनॉलचे प्रमाण वाढले आहे.

इथेनॉल पुरवठ्यात बी-हेवी मोलॅसिस, उसाचा रस आणि सी-हेवी मोलॅसिस यांचाही वापर केला जात असून, त्यांचा वाटा अनुक्रमे सुमारे १७ कोटी, ४ कोटी आणि १ कोटी लिटर इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी ही वाढ महत्त्वाची मानली जात आहे. धान्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलचा वाटा जूनमधील सुमारे ७३ टक्क्यांवरून जुलैमध्ये ७६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामुळे इथेनॉल निर्मितीत धान्य आणि मका आधारित उद्योगांचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे चित्र आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »