२४ तासांत पंचनाम्यांचे आदेश; शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी १२ मोठ्या सवलती घोषित

मुंबई । शुगरटुडे विशेष वृत्त
सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची मोठी तूट आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये ‘प्रथम ट्रिगर‘ (Trigger-1) नुसार अधिकृतपणे दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर क्र. सनमती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२) निर्गमित करण्यात आला आहे.
कृषी आयुक्तांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, जून महिन्यापासून झालेली पावसाची तूट आणि इतर नैसर्गिक घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पिकांची स्थिती बिकट झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ च्या तरतुदींनुसार शासनाने तातडीने पावले उचलत या तालुक्यांमध्ये विविध विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
पिकांचे जीपीएस फोटो अन् तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
शासनाने सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, ज्या २६५ तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ लागू झाले आहे, तिथे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी.
- सर्वेक्षण प्रक्रिया: प्रत्यक्ष पाहणी केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि जीपीएस (GPS) कोऑर्डिनेट संकलित केले जातील.
- अहवाल सादरीकरण: हा संपूर्ण पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासन स्तरावर तात्काळ सादर केला जाईल.
- मदतीची स्वतंत्र घोषणा: विहित कार्यपद्धतीनुसार सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष आर्थिक मदतीची घोषणा स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे केली जाणार आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी १२ मोठ्या सवलती आणि उपाययोजना
दुष्काळी परिस्थितीची झळ बसलेल्या २६५ तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर, जनावरे आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने खालील १२ विशेष सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत:
- जमीन महसुलात सूट: संबंधित भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात पूर्ण सूट दिली जाईल.
- पीक कर्जाचे पुनर्गठन: थकीत व चालू पीक कर्जांचे पुनर्गठन केले जाईल.
- कर्ज वसुलीस स्थगिती: शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जांच्या वसुलीस तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.
- कृषी पंपाच्या वीजबिलात सूट: कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सवलत लागू असेल (७.५ हॉर्सपावरपर्यंतच्या वीजपंपांचे बिल आधीच माफ करण्यात आले असून त्यावरील क्षमतेच्या पंपांना ही सूट लागू होईल).
- परीक्षा शुल्कात माफी: प्रभावित भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल.
- रोहयो कामांत शिथिलता: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामांना मंजुरी दिली जाईल.
- पिण्याच्या पाण्याचे टँकर्स: पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जाईल.
- वीज जोडणी खंडित करण्यास मनाई: टंचाईग्रस्त घोषित गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी कोणत्याही परिस्थितीत खंडित केली जाणार नाही.
- अन्नधान्याची मोफत/सवलतीची सोय: शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी विशेष व्यवस्था उभारली जाईल.
- चारा डेपो व छावण्या: जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील, अशी व्यवस्था केली जाईल.
- जलसंधारणाची कामे: गावपातळीवर जलसंधारणाची व पाणी साठवणीची कामे प्राधान्याने सुरू केली जातील.
- पाणी नियोजनाचे निर्देश: पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाईल.
विभागवार व जिल्हावार २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी
शासनाने जाहीर केलेल्या परिशिष्ट-१ नुसार विभागांनुसार बाधित तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
१. नाशिक विभाग (अहिल्यानगरसह सर्वाधिक ४९ तालुके)
- अहिल्यानगर (१४): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.
- जळगाव (१५): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
- नाशिक (१०): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.
- नंदुरबार (६): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.
- धुळे (४): धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर.
२. छत्रपती संभाजीनगर / मराठवाडा विभाग (सर्व ७४ तालुके)
- नांदेड (१४): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.
- बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
- लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.
- छत्रपती संभाजीनगर (९): संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
- परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
- जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.
- धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा.
- हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.
३. पुणे विभाग (३९ तालुके)
- सोलापूर (११): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
- पुणे (८): भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.
- सातारा (६): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
- कोल्हापूर (६): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.
- सांगली (४): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ.
४. अमरावती विभाग (५६ तालुके)
- यवतमाळ (१६): यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.
- अमरावती (१४): अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
- बुलढाणा (१३): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.
- अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बारशीटाकळी.
- वाशीम (६): वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा.
५. नागपूर विभाग (३९ तालुके)
- नागपूर (१४): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
- चंद्रपूर (१२): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूळ, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभूर्णा.
- वर्धा (७): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.
- भंडारा (३): भंडारा, पवनी, लाखंदूर.
- गडचिरोली (२): गडचिरोली, चामोर्शी.
- गोंदिया (१): तिरोडा.
६. कोकण विभाग (१२ तालुके)
- सिंधुदुर्ग (८): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
- रत्नागिरी (३): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर.
- रायगड (१): श्रीवर्धन. (ठाणे व पालघर जिल्ह्यांत निरंक).






