पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरण: पुण्याच्या चोरडिया बंधूंना पोलिसांची नोटीस

२३ कोटींचा संशयास्पद व्यवहार तपासाला गती
अहिल्यानगर । शुगरटुडे
देवीभोयरे (तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव व विक्रीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला आता पुन्हा एकदा मोठा वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २३ कोटी रुपये वर्ग केल्याचा आरोप असलेले पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजक अतुल चोरडिया आणि अशोक चोरडिया या बंधूंना पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस जारी केली आहे.
तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी गेल्या आठवड्यातही चोरडिया बंधूंना चौकशीसाठी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते पोलिसांसमोर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा नोटीस पाठवून येत्या सोमवारी पारनेर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जून २०२६ मध्ये पारनेर न्यायालयाच्या थेट निगराणीखाली या गुन्ह्याचा तपास चालवण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर काही काळ थंडावलेल्या या प्रकरणाला आता नव्याने गती मिळाली आहे.
२३ कोटींचा व्यवहार
तक्रारीतील माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून पारनेर कारखान्याचा लिलाव सुरू असताना, तो खरेदी करण्यासाठी चोरडिया बंधूंनी पुण्याचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ९ वेगवेगळ्या बँक खात्यांवर २३ कोटींची रक्कम पाठवली होती. नवले कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या जबाबानुसार, ही रक्कम २०१५ मध्ये जमिनीच्या विकसनासाठी (डेव्हलपमेंट) पाठवण्यात आली होती. मात्र, संबंधित संचालकांनी ही रक्कम त्यांच्या ‘क्रांती शुगर कंपनी’त न गुंतवता थेट महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला परस्पर वर्ग केली आणि ‘क्रांती शुगर’च्या नावाने कारखान्याची मालमत्ता खरेदी केली. केवळ कागदोपत्रीच अस्तित्व असलेल्या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा कारखाना कसा खरेदी केला, यावर तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
३४० कोटींचे कर्ज आणि मनी लाँड्रिंगचा आरोप
पारनेर कारखाना बचाव समितीने या संपूर्ण व्यवहारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. चोरडिया बंधूंनी पुरवलेली २३ कोटी रुपयांची रक्कम हा कथितपणे ‘काळा पैसा’ होता आणि त्यातून कारखान्याची मालमत्ता खरेदी करून नंतर त्याच मालमत्तेवर राज्य सहकारी बँकेकडून तब्बल ३४० कोटी रुपयांचे कर्ज उचले गेले, असा आरोप बचाव समितीने केला आहे.
अशा प्रकारे काळा पैसा पांढरा (मनी लाँड्रिंग) करण्यात आल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाला आर्थिक रसद पुरवणाऱ्या चोरडिया बंधूंची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बचाव समितीचे वकील ॲड. रामदास घावटे यांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोण आहेत चोरडिया बंधू?
अतुल चोरडिया आणि अशोक चोरडिया हे पुण्यातील बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित व्यावसायिक कुटुंब मानले जाते. ते पुण्यातील ‘सॉलीटेअर ग्रुप’चे (Solitaire Group) प्रमोटर्स आणि संचालक असून, गेल्या चार दशकांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आता साखर कारखाना खरेदी प्रकरणातील २३ कोटींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे हे पिता-पुत्र पोलिसांच्या तपासाच्या फेऱ्यात अडकले आहेत.






