साखर कारखानदारी वाचवण्यासाठी व्यावसायिकता स्वीकारा – परिचारक : पांडुरंग कारखान्यावर साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मंथन

पुणे/पंढरपूर: “साखर उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मात्र सध्या हा उद्योग शासकीय धोरण, आर्थिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी कचाट्यात सापडला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना आता केवळ राजकारण करून चालणार नाही, तर कारखाने नफ्यात चालवण्यासाठी ‘व्यावसायिकता’ (Professionalism) आणणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी केले.
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया), पुणे (डीएसटीए) आणि कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साखर उद्योग मंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यकाळातील आव्हानांवर सविस्तर भाष्य केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ उपस्थित होते. व्यासपीठावर डीएसटीएचे अध्यक्ष सोहन शिरगावकर, सचिव चंद्रकांत माने, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक सीए मनोहर जोशी इ. ची उपस्थिती होती.
डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. या मंथनासाठी महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पांडुरंग कारखान्याच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. प्रारंभी विविध कारखान्यांच्या सुमारे पन्नासवर कार्यकारी संचालकांचा सत्कार करण्यात आला.
८०० टनांपासून १० हजार टनांपर्यंतचा प्रवास
मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भाषणाची सुरुवात करताना कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “स्वर्गीय मालकांच्या नेतृत्वाखाली एका खाजगी कारखान्याचे रूपांतर सहकारात झाले. ८०० टन गाळप क्षमतेपासून सुरू झालेला हा कारखाना आज १०,००० टनांच्या पुढे गेला आहे” .
बँका आता ‘चेहरा‘ नाही, तर ‘कागद‘ बघतात!
सहकार क्षेत्रातील बदलत्या आर्थिक समीकरणांवर भाष्य करताना परिचारक म्हणाले, “पूर्वीच्या काळी बँका माणसाचा चेहरा बघून कर्ज द्यायच्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता बँका तुमच्या कागदाकडे आणि बॅलेन्स शीट कडे बघून कर्ज देतात. अशा वेळी जर कारखाना नफ्यात चालला नाही, तर या उद्योगाचे भवितव्य अंधारात आहे”.
कार्यकारी संचालकांना (MD) महत्त्वाचा सल्ला
प्रशांतराव परिचारक यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. ते म्हणाले:
- ठाम भूमिका घ्या: “सहकारात चेअरमनला अनेकदा राजकीय विचार करावा लागतो, पण अधिकारी म्हणून तुम्ही ताठ कण्याने काम केले पाहिजे. जिथे चुकीचे निर्णय होत असतील, तिथे चेअरमनलाही सांगता आले पाहिजे.”.
- “अधिकारी अनेकदा सुरक्षित पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास ते कच खातात. खाजगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारातील दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च जास्त असतो, तो कमी करण्यासाठी प्रयत्न करा” .
उद्योगापुढील गंभीर आव्हाने:
खरं तर सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांसाठीच उभी राहिली. मात्र आता शेतकरी कारखान्याचे ऐकत नाहीत. रिकव्हरी देणाऱ्या वाणांऐवजी ते केवळ उत्पादकता देणाऱ्या ‘२६५’ सारख्या वाणांचा आग्रह धरत आहेत, ज्यामुळे रिकव्हरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर विचार करावा, असे आवाहन करून ते म्हणाले की, पूर्वी कारखाने १८०-२०० दिवस चालायचे, पण आता ऊस टंचाई आणि मजुरांच्या प्रश्नामुळे हंगाम १०० दिवसांवर आला आहे. कारखानदारांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येकाला आमदार किंवा खासदार व्हायचे आहे, त्यामुळे उसाच्या दराबाबत विनाकारण स्पर्धा होऊन कारखान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची गरज आहे.
केवळ साखरेवर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. “केंद्र आणि राज्य सरकारकडून इथेनॉल आणि सीबीजी (CBG) प्रकल्पांसाठी चांगले प्रोत्साहन मिळत आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC) कडूनही मदतीचा ओघ सुरू आहे. या संधीचा फायदा घेऊन कारखान्यांनी १५ वर्षांचा दीर्घकालीन आराखडा तयार करावा,” असे परिचारक यांनी सुचवले.
(इतर वक्त्यांची भाषणे आणि सविस्तर वृत्त लवकरच)





