साखर कारखान्यांसाठी जीएसटी प्रशिक्षण जुलैऐवजी ऑगस्टमध्ये
पुणे : महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि टीडीएस बाबतचा प्रशिक्षण वर्ग येत्या ९ व १० ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे, असे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल कारंजकर यांनी कळवले आहे.
हा प्रशिक्षण वर्ग १९ आणि २० जुलै २०२३ रोजी घेण्याचे आधी ठरले होते, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे तो पुढे ढकलावा लागला. तो आता ९ आणि १० ऑगस्ट रोजी होईल आणि आधी ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे, असे असोसिएशनने एका पत्रकाद्वारे कळवले आहे. तसे पत्र सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना १७ जुलै २०२३ पाठवण्यात आले आहे.
आपल्या साखर कारखान्यातील संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांना ८ ऑगस्ट रोजी मुक्कामासाठीच किंवा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, असेही कळवण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्थळ ‘राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे (जुन्या पुणे-मुंबई हायवेवर टोलनाक्यापासून तीन किमी वर, जैन मंदिर व सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये’ असे आहे.