ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना ऊबदार कपड्यांचे वाटप
पुणे : विठ्ठलवाडी तळेगाव (ता. शिरूर) परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना मायेची ऊब फाउंडेशनच्या वतीने ऊबदार रजई, चादर व कानटोपी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष राहुल चातूर, खंडेराव होळकर, गणेश ढवळे, अरविंद गवारी, गणेश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐन कडाक्याच्या थंडीत आदिवासी पट्ट्यातील शालेय मुलांचे तसेच ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे संरक्षण व्हावे या हेतूने हा उपक्रम सुरु केला आहे. यावर्षी जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे २०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील तिरपाड केंद्रातील बालवीरवाडी पिंपळगणे, न्हावेड, सडकेचीवाडी व कापरवाडी या आदिवासी पट्ट्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनाही उबदार साहित्य वाटप करण्यात आले, असे चातुर यांनी सांगितले.