कोल्हापूर जिल्ह्यात अडीच हजार मुले शाळाबाह्य

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा समावेश
कोल्हापूर : लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कोल्हापूर येथील ‘अवनि’ संस्थेने केलेल्या पाहणीत सुमारे अडीच हजार मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ऊसतोड मजूर, साखर कारखान्यांवरील कंत्राटी मजूर, वीटभट्टीवरील कामगार यांच्या मुलांचा समावेश आहे.
‘अवनि’ सामाजिक संस्थेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील 2,495 मुले अशा ठिकाणी मिळून आली. ही मुले शाळाबाह्य असून, शिक्षणापासून दुरावलेल्या या मुलांना पुन्हा ज्ञानगंगेत आणण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

हंगामी स्थलांतरित मजुरांसोबत त्यांची मुलेही फिरतात. अनेकदा ही मुले बालमजूर म्हणून येथे राबताना नजरेस पडतात. अशात त्यांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क ती गमावून बसतात. शिवाय ती कुपोषणाची शिकारही होतात.
कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 11 साखर कारखाने आणि वीट्टभट्ट्यांवर 0 ते 18 वयोगटातील 2,495 मुले मिळून आली आहेत. 0 ते 3 वयोगटातील 517 बालके, 4 ते 6 वयोगटातील 511 बालके, 7 ते 14 वयोगटातील 1,163 मुले, तर 15 ते 18 वयोगटातील 494 मुले मिळून आली आहेत.
स्थलांतरित व हंगामी शाळाबाह्य बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी ‘अवनि’ संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले.