सहकार क्षेत्रात नवा विकास अध्याय; महामंडळ व रामफेड यांच्यात ऐतिहासिक करार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अलिबाग :
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षणासाठी व क्षमता वृद्धीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व रामफेड — रायगड जिल्हा एम पॅक्स सेवा सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादीत अलिबाग आणि यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सदर करार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यालय ,अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन रामफेड मार्फत करण्यात आले होते.

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, प्रमाणपत्र व्यवस्था, संस्थात्मक क्षमता विकास आणि सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सहकार क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता हा करार महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमास जयंतभाई पाटील, माजी आमदार तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मंगेश तिटकारे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, निनाद पाटील, उपाध्यक्ष, रायगड जि. म. स. बँक, अरुण काकडे, राज्य समन्वयक, डॉ भास्कर पाटील,पणन व्यवस्थापक, प्रशांत चासकर,व्हॅल्यू चेन एक्सपर्ट हे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अधिकारी तसेच मंदार वर्तक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीकांत पाटील विशेष कार्य अधिकारी तसेच रामफेडचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कराराचे प्रमुख उद्देश
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या विकासासाठी सक्षम, आधुनिक आणि मार्गदर्शक प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करणे हा आहे. या केंद्राच्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करणे, विद्यमान संस्थांचे कामकाज अधिक सक्षम करणे, संचालक व कर्मचाऱ्यांना कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षण देणे, तसेच सहकार क्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता वाढवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

सदर कराराअंतर्गत महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम राबविणे, संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करणे, कायदे, नियम, लेखापरीक्षण, व्यवस्थापन व प्रशासन यावरील प्रशिक्षण देणे, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं-सहायता गट आणि सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवणे या बाबींवर संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या प्रशिक्षण केंद्राला तांत्रिक मार्गदर्शन, अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण पद्धती, प्रमाणपत्र व्यवस्था, गुणवत्ता नियंत्रण आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आवश्यक साहाय्य व मार्गदर्शन केले जाणार आहे.

रामफेड या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, दैनंदिन व्यवस्थापन, प्रशिक्षणार्थी नोंदणी, कार्यक्रमांचे आयोजन, प्रशासकीय व्यवस्था आणि स्थानिक स्तरावरील समन्वयाची जबाबदारी पार पाडणार आहे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना या केंद्राशी जोडून प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची क्षमता वाढवण्यावर रामफेड भर देणार आहे.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवे बळ

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने व रामफेडने केलेला हा सामंजस्य करार महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी दूरदृष्टीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहकारी संस्था केवळ स्थापन होण्यापुरत्या मर्यादित न राहता त्या सक्षम, शिस्तबद्ध, कायदेशीरदृष्ट्या सजग आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाव्यात, यासाठी या प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी संस्था, पतसंस्था, शेतकरी गट, स्वयं-सहायता गट, महिला व युवकांना सहकार क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात महाराष्ट्रातून प्रशिक्षित व सक्षम सहकार नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेत.

या कराराबाबत उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, सहकार क्षेत्रात बदलत्या काळानुसार प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान, कायदेशीर समज, व्यवस्थापन कौशल्य आणि आर्थिक शिस्त अत्यंत आवश्यक आहे. रामफेड आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभे राहणारे हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल.
भविष्यातील दिशा
या सामंजस्य करारानंतर पहिल्या टप्प्यात सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. त्यानंतर सहकारी संस्था स्थापन करू इच्छिणाऱ्या गटांना मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक संस्था व स्वयं-सहायता गटांसाठी विशेष कार्यक्रम, तसेच सहकार क्षेत्रातील कायदे, लेखा, व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास यावर आधारित प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व रामफेडच्या या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, हा करार सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.


या करारानुसार अलिबाग येथे रामफेडच्या संलग्न सहकारी साडेतीनशेवर सहकारी संस्था यांच्यासमवेत भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन/ आयोजन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महामंडळाचे अध्यक्ष  सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजित आहे..

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »