साखर जप्त करून एफआरपी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
धाराशिव : जिल्ह्यातील ज्या-ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची अंतिम बिले दिलेली नाहीत, त्या सर्व कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यात यावेत. अन्यथा राष्ट्रवादी पक्ष संबंधित साखर कारखान्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनाच्या माधमातून दिला आहे. दुधगावकर यांनी मंगळवारी (दि. ५) पुणे येथे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांना या मागणीबाबतचे निवेदन दिले आहे.
या दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, फेबुवारीपासूनचे ऊसबील आणि अंतिम देयके शेतकऱ्यांना दिलेली नाहीत, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित कारखान्यांची साखर जप्त करून आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे देयके द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.






