साखरेची रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न – बाजीराव सुतार

पुणे – यंदाच्या हंगामात आमच्या साखर कारखान्याचे रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला चांगले यश मिळत आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (MD) बाजीराव सुतार यांनी केले. आम्ही दररोज 0 .10 प्रमाणे साखरेचा उतारा वाढवत आहोत, असेही त्यांनी अभिमानाने नमूद केले
पुण्यात साखर संकुल येथे आलेल्या बाजीराव सुतार यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंगेश तिटकरे यांनी महामंडळामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, त्यांनी बाजीराव सुतार यांचे हृद्य स्वागत केले
सुतार म्हणाले की, यंदाच्या हंगामात आम्ही सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन केले आहे, संपूर्ण यंत्रणा त्या दृष्टीने राबत आहे त्यामुळे चांगले परिणाम दिसून येत आहेत. गाळप ते साखर प्रक्रियेपर्यंत आम्ही डोळ्यात तेल घालून काम करत आहोत. त्यामुळे साखर उतारा वाढवण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळत आहे. उसामध्ये अजिबात पाचट येऊ नये इथपासून ते साखर निर्मिती प्रक्रियेपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक काम केले जात आहे.
तसेच पाचट विरहित स्वच्छ व ताज्या कारखान्यास पुरवठा होत असल्याने दररोज रिकवरी वाढ ही 0.03 ते 0.10% चे दरम्यान होत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले व संचालक मंडळातील सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन आणि कारखान्याची सर्व तांत्रिक टीम व शेतकी खात्याची सर्व टीम , तसेच सर्व ऊस सभासद शेतकरी बांधवांच्या, कुशल अधिकाऱ्यांच्या व कामगार बंधू यांच्या सहकार्याने यंदाचा हंगाम अभूतपूर्व असा यशस्वी होईल, असा विश्वासही बाजीराव सुतार यांनी व्यक्त केला.
कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले तसेच महाराष्ट्रातील युवा नेते विनायकबाबा भोसले यांचेही सूक्ष्म व्यवस्थापन, मार्गदर्शन व नियोजन कृष्णा कारखान्यास सतत असते, असे सुतार यांनी आवर्जून नमूद केले.






