तब्बल १९ उस उत्पादक शेतकऱ्यांवर गुन्हा

बीड : जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या रास्ता रोको व चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल १९ शेतकऱ्यांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अजय सिंग, दिलीपराव राऊत, तुकाराम रावसाहेब नावडकर, कृष्णा पांडुरंग सोळंके, नामदेव माणिकराव सोजे, मोहन माणिकराव जाधव, जगदीश महादेव फरताळे, संजय केशव आंधळे, नारायण गणेश तौर, अजय गंगाधर बुरांडे, नारायण रामभाऊ गोले, भास्कर खांडे, विजय पांडुरंग राठोड, कुलदीप मधुकर करपे, गंगाभीषण काशिनाथराव थावरे संपत रामसिंग चव्हाण, दत्ता मधुकर आढाव, विजय दराडे, शुभम भास्कर माने, नंदकुमार राधाकिसन शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. यासंबंधी गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी आंदोलकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
राज्यात चालू गाळप हंगाम २०२५-२६ हा गेली २७ दिवसांपासून सुरू झाला आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी आपला दर निश्चित केला नाही. तसेच उसाला उत्पादन खर्चाच्या आधारित पहिल्या हप्त्याची एकरकमी प्रतिटन चार हजार रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यासंबंधी आंदोलन करताना पोलिसांनी रास्ता रोको न करता कायदेशीर मार्गाने त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडाव्यात. सार्वजनिक जनजीवन विस्कळीत होईल, अशी कुठलीही कृती करू नये. याची लेखी नोटीस दिली होती. मात्र आंदोलन करतांना हा आदेश न जुमानता रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यावर ते ठाम राहिले. यामुळे या शेतकऱ्यावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा हातात घेऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा कोणीही असला तरी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी दिला आहे.






