साखर व्यापाऱ्याची कार फोडल्याप्रकरणी गुन्हा

सांगली : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून एका साखर व्यापाऱ्याच्या कारची आज्ञाताने तोडफोड केली आहे. ही घटना येथील संजयनगरमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) या साखर व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रम पाटील हे साखरेचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे अलीकडेच साखर निर्यातीचा एक मोठा ठेका आला आहे. त्याची माहिती पुण्यातील नेत्याच्या भावाला कळाली. त्याने सांगलीतील एका व्यक्तीच्या माध्यमातून खंडणीची मागणी सुरू केली. अनेकदा फोन केले. काही लोक घरी पाठवले. धमक्या दिल्या. पुण्यात नेत्याचा भाऊ एक दिवस विक्रम पाटील यांच्या घरी आला, त्यानेही धमकी दिली. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाटील यांनी पोलिसांत सादर केले आहेत. त्यानंतर तिघा अनोळखींनी येऊन विक्रम पाटील यांची मोटार फोडली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसांत सादर केले. या हल्ल्यात पुणे जिल्ह्यातील एका नेत्याच्या भावाचा थेट सहभाग असल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. या तीन व्यक्तींनी काचा फोडण्याआधी ‘तू रणजित जाधव यांच्या विरोधातील खटला मागे घे. त्यांनी तुला इचलकरंजीला बोलावले आहे. तुला सोडणार नाही’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.