कारखान्याने केलेल्या हृद्य सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली : रासकर

अभीष्टचिंतन सोहळ्यात यांच्या भावना
पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने केलेल्या माझ्या हृद्य सत्कार सोहळ्यामुळे मी भारावून गेलो आहे, या कार्यक्रमामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे, मी त्यास नव्या ऊर्जेने न्याय देईन, असे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. (दत्ताराम) रासकर यांनी केले.
श्री. रासकर यांच्या एकाहत्तरी निमित्त, स्वातंत्र्यदिनी त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा कारखान्याच्या वतीने, कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत होते. कार्याध्यक्ष विकासअण्णा रासकर, ऊस तज्ज्ञ डॉ. सुरेश पवार, संशोधक डॉ. शहाजीराव चव्हाण, अल्केमचे डॉ. आर. पी. पाटील, दौंड शुगरचे संचालक शहाजीराव गायकवाड, डीएसटीएचे एम. आर. कुलकर्णी, ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचे मुख्य संपादक नंदकुमार सुतार, कॅन बायोसिसचे उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
श्री. रासकर यांचे ७१ दिव्यांनी सपत्निक औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांच्या मातोश्रीदेखील सुपुत्राचा अभीष्टचिंतन सोहळा कौतुकाने पाहत होत्या. मान्यवरांच्या हस्ते मानपत्रदेखील त्यांना देण्यात आले.
कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी प्रास्ताविकामध्ये डी. एम. रासकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना नर्म विनोदी शैलीत काही किस्सेही सांगितले. रासकर यांची केवळ एकाहत्तरीचे नव्हे, तर शतकमहोत्सव देखील याच कारखान्यावर आपणास साजरा करायचा आहे, असे उद्गार त्यांनी काढले. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रासकर यांच्या कन्येसह, कारखान्यातील निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
रासकर यांच्या नावात दत्त आणि राम दोन्ही आहेत. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा दत्ताराम यांच्यासारखे अत्यंत समर्पित व्यक्तिमत्त्व घडते, अशा भावना व्यक्त करून, ‘श्रीनाथ कारखान्याच्या प्रगतीसाठी ऊसतज्ज्ञ म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत राहीन’, अशी ग्वाही डॉ. सुरेश पवार यांनी दिली.
चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत यांनी कारखान्याची उभारणी करण्यापासून ते रासकर यांची नेमणूक कशी झाली याचा धावता आढावा घेतला. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या प्रगतीमध्ये रासकर यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे, त्यांना आम्ही कधीच निवृत्त करणार नाही, त्यांचा शतकपूर्तीही सोहळा येथेच पार पडावा, अशा शुभेच्छादेखील मी देतो, असे उद्गार राऊत यांनी काढले.
या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून रासकर यांचे चाहते आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे हितचिंतक, शेतकरी, कामगार, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीगोंद्यावरून रासकर यांचे बालमित्रदेखील आवर्जून उपस्थित होते. शुगर टास्क फोर्सचे सतीश देशमुख, सहकार भारतीचे साहेबराव खामकर, शुगर इंडस्ट्रीज परिवारचे दिलीप वारे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.

यावेळी डी. एम. रासकर यांनी व्यक्त केलेले मनोगत खालीलप्रमाणे (जशास तसे)
सर्वांना माझा विनम्र नमस्कार.
कारखान्याच्या व कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या उत्कर्षासाठी आपण वेळोवेळी पूजा-अर्चा, होम हवन करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय राऊतसाहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. आपल्या कारखान्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे कृपाछत्र लाभलेले आहे.
आज माझा “अभिष्टचिंतन सोहळा” आयोजित केल्याचे समजल्यावर मला जरा संकोचल्यासारखे वाटले. कारण अश्या कार्यक्रमाची मला कधी सवय नाही. आता स्टेजवर माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त करण्यात आल्या आणि जे विविध विधी करण्यात आले ते पाहून मी भारावून गेलो आहे. एव्हढे केल्यानंतर आभार व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो आणि दोन शब्द बोलण्याची संधी घेतो.
तसा मी सामान्य व्यक्तिमत्वाचा माणूस. माणसाला जन्माला घालताना परमेश्वराकडे दोन पर्याय असतात. गोरा रंग व काळा रंग. त्यापैकी त्याने मला काळा रंग देण्याचे ठरवले. धष्टपुष्ट व सडपातळ शरीरयष्टी पैकी सडपातळ शरीरयष्टी दिली. बोलका व अबोल स्वभावापैकी कमी बोलण्याचा स्वभाव मला दिला. आता हे सर्व परमेश्वराने दिलेले असल्याने मला स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी विचार केला माझ्या हातात काय आहे? तर मला उत्तर सापडले ते म्हणजे “निष्ठेने कष्ट करणे” ही बुद्धीसुद्धा मला परमेश्वरानेच दिली आणि मी ते स्वीकारले व माझी वाटचाल करीत राहिलो. प्रवास तसा खडतरचं होता. पण प्रत्येक ठिकाणी चांगली माणसं भेटत गेली त्यामुळे तो सुखकर वाटू लागला.
एकूणच आयुष्यात संगतीचं खूप महत्व आहे. आपणही ऐकलं असेल की, एक पाण्याचा थेंब चिखलात पडला तर तो व्यर्थ होतो. तोच पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, पण स्वाती नक्षत्राच्या मुहूर्तावर तो शिंपल्यात पडला, तर त्याचा खरोखर मोती होतो. योग्य वेळी, योग्य स्थळी असणं यावर ठरतं की आयुष्याची माती होणार की त्याचा मोती होणार.
एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की, मी जो आज आहे त्यामध्ये आपल्या कारखान्याचे अध्यक्ष मा. राऊतसाहेब यांच्या सहवासामुळे व संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आहे, हे मी प्रांजळपणे कबुल करतो. मा. राऊतसाहेबांची व माझी वैचारिक पातळी जुळल्यामुळे मला काम करणे सोयीचे झाले. हा योग यायला सुद्धा नशीब लागतं. मी आतापर्यंत आठ चेअरमन बरोबर काम केले पण मा. राऊत साहेबांच्या बरोबर काम करण्यात जी सहजता आणि समाधान मिळाले ते अपूर्वच म्हणावे लागेल.
आमच्या दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्या संचालक मंडळसारखे एकजीव संचालक मंडळ दुर्मिळच असेल. आमच्या संचालक मंडळाने मला खूप आदराची वागणूक दिली. त्यामुळे माझा कामातील उत्साह वाढत गेला. यापूर्वीच्या वक्त्यांनी व मानपत्रात जो कारखान्याच्या प्रगतीचा उल्लेख केला, त्याचे श्रेय अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या टीमवर्कला जाते.
मी आपणांस आवर्जून सांगू इच्छितो की, माझे आयुष्य घडवण्यात माझ्या आईचा मोठा आहे. ती माझे कौतुक पाहायला येथे हजर आहे, हा केवढा भाग्याचा क्षण. माझी आई म्हणजे म्हणजे संस्काराचं एक विद्यापीठच आहे. या विद्यापीठात माझे शिक्षण झाले. मला तिने कधी असं कर, असं वाग, असं सांगितलं नाही. पण ती जसं वागते तसं वागण्याचा मी प्रयत्न केला आणि आता जसा आहे तसा घडलो.
माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत मला माझ्या धर्मपत्नीची भक्कम साथ मिळाली. माझ्या सारख्या कुटुंबाकडे लक्ष न देणाऱ्या नवऱ्यालाही तिने सांभाळून घेतलं. माझ्या कुटुंबीयांची, नातेवाईकांची, मित्रमंडळींची व साखर उद्योगातील स्नेह्यांची व मार्गदर्शकांची मला मोठी व मोलाची साथ लाभली. बऱ्याच कारखान्यातील तज्ज्ञ मंडळी आज उपस्थित आहेत. आज या कार्यक्रमाला माझे बरेच बालमित्र आणि शाळा-कॉलेजमधील मित्र देखील हजर आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.
ह्या कार्यक्रमाची मला कल्पना देताना मा. राऊत साहेब म्हणाले, तुमचा आम्ही सत्कार करणार आहोत, निरोप समारंभ नाही. पण मला सांगवसं वाटतं जेव्हा मला वाटेल की मी पदाला न्याय देऊ शकत नाही तेव्हा मी स्वतः होऊन मा. राऊत साहेबांच्या परवानगीने थांबेन.
माझ्या या सत्कार समारंभाच्या नियोजनाबद्दल मी राऊत साहेब, मा. विकास अण्णा रासकर, मा. योगेशराव ससाणे साहेब, मा. माधव साहेब, मा. किसनदादा शिंदे, मा. बाबूशेठ कदम व सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानतो व कृषिनाथ कारखान्याचे अध्यक्ष मा. करपे साहेब व त्यांचे सर्व संचालक मंडळ, श्रीनाथ उद्योग समूहातील सर्व मान्यवरांचे व अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थिती बद्दल आभार मानतो. माझ्या प्रेमापोटी बरेच जण लांबून आलेत, तेही सुट्टीच्या दिवशी… त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
या अभीष्टचिंतन सोहळ्यामुळे माझा उत्साह आणखी वाढणार आहे आणि त्याचबरोबर जबाबदारीही वाढणार आहे, तसेच पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचे बळ मला यामुळे मिळाले आहे,
माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत आलेल्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.