साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी अधिकारी कसे व्हाल ?
“How to be a Successful HOD in Sugar and Allied Industry”
डी. एम. रासकर
(मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पुणे)
लेखाचं नाव मुद्दाम आपलं सर्वांच लक्ष वेधून घेण्याकरिता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्षात विषयाची मांडणी मी मराठीत करणार आहे. कारण कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लगेच व चांगल्याप्रकारे समजते.
प्रत्येक खातेप्रमुख हा त्याच्या साखर उद्योगातील करिअरची सुरुवात “ट्रेनी” पासून करतो व टप्प्या टप्प्याने प्रगती करीत HOD पर्यंत पोहोचतो. हा प्रवास तसा काहींच्या दृष्टीने दीर्घकाळाचा असतो, तर काहींच्या दृष्टीने खडतर…
दीर्घकाळाचा असण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला नोकरीला लागल्याबरोबर त्याच पदावर दीर्घकाळ राहणं, कुठलंही स्वप्न न पाहणं, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला नको वाटणं, कालांतराने बरोबरचे सहकारी कुठल्या कुठे निघून गेल्याचं कळल्यावर उशिरा जाग येणं व कसंतरी HOD पर्यंत पोहोचणं. काही जण लवकरच ‘जंप’ मारत तिथपर्यंत पोहचतात. एकतर त्यांच्याकडे तेवढे कौशल्य असतं, किंवा त्यांना सुदैवाने लवकर संधी मिळते, अथवा काहींना नात्यागोत्यांचा, ओळखींचा उपयोग होतो.
काहींचा प्रवास खडतर होतो, म्हणजे संधी लवकर मिळते; पण पुरेसं कौशल्य प्राप्त केलं गेलं नसल्याने त्या पदावर टिकणं अवघड होतं. पुन्हा मागं येणं अपमानास्पद वाटतं. अश्या द्वंद्वात संपूर्ण आयुष्याची वाताहत झाल्याची उदाहरण आपल्या समोर असतीलच.
म्हणून माझे दोन शब्द वाचणाऱ्यांनी एकच ठरवायचं की, लवकरात लवकर खातेप्रमुख पदापर्यंत पोहचायचं आणि तेही यशस्वी खातेप्रमुख म्हणून झेंडा फडकावायचा व पुढच्या टप्प्याला म्हणजे MD/CEO या पदाकडे वाटचाल करायची.
या यशाचा भक्कम पाया हा ट्रेनिंगच्या काळातच घातला जातो. या कालावधीत सोपवलेल काम व दिलेला वेळ या व्यतिरिक्त जास्तीचं काम, जास्त वेळपर्यंत केलं तर तुमचं ज्ञानही वाढेल व तुम्ही वरिष्ठांच्या लेखी तुमची एक अभ्यासू, कष्टाळू व्यक्ती म्हणून नोंद होईल. हीच नोंद तुम्हाला वेळोवेळी भविष्यकाळात कामी येईल आणि तुम्हाला पहिलं प्रमोशन मिळवून देईल.
आता तुम्ही Middle Management मधे प्रवेश केलेला असतो. तुम्हाला बरेच कर्मचारी साहेब म्हणून संबोधू लागतात. तुम्हालाही बरे वाटते. इथेच धोक्याची घंटा वाजते. ती म्हणजे न कळत आपला ‘ईगो’ जागृत होतो. छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत, तर आपण आपले वरिष्ठ व कनिष्ठ दोघांनाही दोष देऊ लागतो.
,,
साधं गेटवरून जाताना आपल्याला सुरक्षा गार्डने गेटपासची मागणी केली, तरी अवमान वाटतो. आपण त्याच्याशी हुज्जत घालतो. जितक्या लवकर आपण या स्थितीतून बाहेर पडू तितक्या लवकर आपली उपखातेप्रमुख (Deputy) पदाची संधी दृष्टिक्षेपात आलेली असते. तुम्ही सिनिअर किंवा डेप्युटी या पदापर्यंत पोहोचता. हे पद खूप नाजुक असते. तुम्ही ज्यांच्या बरोबर काम केलेले असते, त्यांना सोडून तुम्ही पुढे गेलेला असता. त्याचवेळी खातेप्रमुखाला न कळत तुम्ही स्पर्धक वाटू लागता. यासाठी तुम्ही दोन्ही बाजूंना विश्वासात घेणे आवश्यक असते. तरच तुमचा मार्ग सुखकर होतो.
यापुढचा टप्पा म्हणजे खातेप्रमुखाचा. जर तुमचा खातेप्रमुख काही कारणाने कारखाना सोडून गेला आणि व्यवस्थापनाच्या कसोटीत तुम्ही उतरत असाल तर तुम्हाला संधी मिळते. जर खातेप्रमुखाचे चांगले बस्तान बसलेले असेल, तर त्याला न विचलित करता दुसऱ्या कारखान्यात संधी घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. डेप्युटी या पदावर ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त काळ राहु नये. अन्यथा तुम्ही बऱ्याच जणांच्या मार्गातील अडथळा ठरता. म्हणून ही काळजी घ्यावी.
आता खऱ्या अर्थाने तुम्ही खातेप्रमुख झालेले असता. तुमच्या बुद्धी-कौशल्याला भरपूर वाव असतो. एकाच वेळी तुम्हाला एकीकडे व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करायचा असतो. तर दुसरीकडे तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर ‘टीम वर्क’ करायचे असते. त्याचवेळी इतर खातेप्रमुखांसोबत समन्वय राखायचा असतो.
काही HOD सारखे सारखे त्याच पदावर कारखाने बदलत असतात. त्याचे कारण म्हणजे त्यांना नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते. मग ते काही कारणे पुढे करू लागतात.. उदा. हवामान मानवत नाही, पाणीच खराब आहे, कौटुंबिक अडचणी असे गैरसोयीचे पाढे वाचू लागतात, कुणालातरी दोष देणं, प्राप्त परिस्थितीशी जुळवून न घेणं. परिणामी अयशस्वी खातेप्रमुख म्हणून शिक्का लावून घेतात.
तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर, तुम्ही तुमच्या खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलात, तर तुमच्या खात्यातील सर्व कर्मचारी कमी जास्त प्रमाणात तुमचं अनुकरण करतील. त्यामुळे तुमच्यात असणारी शिस्त, काम करण्याची पद्धत संस्थेबद्दलची आत्मीयता, टापटीपपणा हे गुणदेखील त्यांच्यामधे उतरतील. जस-जसा आपला खातेप्रमुख म्हणून अनुभव वाढत जातो, तसा तुमच्यातील ‘ईगो’ आपोआपच कमी होत जातो.
खातेप्रमुख म्हणून काम करीत असताना यशस्वी खातेप्रमुख व्हायचं असेल तर तुम्हाला एक तंत्र / मंत्र सांगतो.
| Zero Pendency | Daily Disposal |
| Quick Response | Fast Feed Back |
हे तंत्र व मंत्र आपण वापरले तर, यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. असो! माझ्या ४७ वर्षाच्या अनुभवातून मी काही निष्कर्ष काढले आहेत ते आपणास निश्चितच उपयोगी पडतील याची मला खात्री आहे.
- १) आपले वरिष्ठ कधीही चुकीचे नसतात. त्यांच्या सूचना अथवा आदेश प्राधान्यक्रमाने पाळावेत. अडचण असल्यास नम्रपणे सांगावे.
- २) आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांपासून कोणत्याही गोष्टी लपवून ठेवू नका. सतत खुले व प्रेरणादायी राहा. त्यांच्यावर विश्वास ठेवा.
- ३) कामाच्या जागेवर जाऊन जवळून पाहणी केल्याने निर्णय घेणे अथवा अडचणी समजणे सोपे जाते.
- ४) व्यवस्थापनाच्या अपेक्षेपेक्षा थोडे अधिक काम करा. अधिकचे रिझल्ट द्या.
- ५) तुमच्या खात्यातील कर्मचाऱ्यांचे पितृत्व तुमच्याकडे ओघानेच आलेले असते. तेव्हा त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा.
- ६) तुमचे ऑफिस, तुमचा संपूर्ण विभाग, अंत्यत स्वच्छ व टापटीप असावा. यामुळे तुमचा व तुमच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह चांगला राहतो. (House Keeping)
- ७) Six Sigma, Poka yoke, 5S, Zero Defect इ. मॅनेजमेंट टूल्स म्हणजे काय हे तुम्ही पण माहिती करून घ्या. तुमच्या स्टाफला अवगत करा व त्याची अंमलबजावणी करवून घ्या.
- ८) तुम्ही अंतर्गत व बाह्य पत्रव्यवहार जास्तीत जास्त ई-मेलद्वारे करा. तुमचं ड्राफ्टटिंग मुद्देसूद, थोडक्यात आशय समजावणारं असावं. शासनाशी व कायदेविषयक पत्रव्यवहार करताना काळजी घ्यावी.
- ९) तुम्ही स्वत: अपडेट राहा, सर्वांना अपडेट ठेवा. तुमच्या खात्यात टेक्निकल लायब्ररी तयार करा. सर्वांनी विविध प्रोसेडिंग्जमधील Research पेपर्स वाचावेत.
- नुसते वाचून थांबू नये, तर पेपर लिहावेत. सादर करावेत. याबाबत न्यूनगंड ठेऊ नये. कारण सर्वजण आपल्या सारखेच असतात, हे ध्यानात ठेवावे.
- १०) नेहमी अशा कारखान्यापासून खातेप्रमुख पदाची सुरुवात करा की, जिथे सुधारणेला खूप वाव आहे. कारण Good पासून Better आणि Better पासून Best करणे तसे अवघड असते. पण Worst पासून Best करणे तसे सोपे असते.
- ११) तुम्ही Safety व Security या दोन्हींना कमी लेखू नका. या बाबीत तितक्याच महत्वाच्या आहेत, जितके तुमच्या खात्याचे काम महत्वाचे आहे.
- १२) आता अत्यंत महत्वाचा मुद्दा, आपल्याला परमेश्वराने खूप गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत. त्यामुळे पर्चेस, सप्लायर्स यांसारख्या क्षुल्लक बाबींमध्ये अपेक्षा ठेवू नये. आपण योग्य मार्गाने जात असाल, तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. शिवाय तुमचा दबदबा राहील, तुमच्या बद्दल आदराची भावना राहील. हे Good Will तुमचं भविष्य घडवील. मला काय म्हणायचं ते आपणास समजले असावे असे मला वाटते.
- १३) खातेप्रमुखांनी आपल्या खात्यातील तांत्रिक काम ५० टक्केच करावे. बाकी २५% खात्याचे प्रशासकीय काम व उर्वरित २५% HR मॅनेजमेंटचे काम करावे. ५० टक्के तांत्रिक काम तुमच्या नजीकच्या सहकाऱ्यांकडून करून (Middle Management) करून घ्यावे.
- १४) तुमच्याकडे उत्तम प्रकारचा Cost Awarness असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला व इतरांना एखादी गोष्ट Calculation च्या आधारे सहज समजावून सांगू शकता.
- १५) सध्याचं २१ वं शतक Industry 4.0 चं आहे. म्हणजे इंडस्ट्रीमधे चौथी क्रांती घडून येणार आहे.
- Artificial Intelligence (AI), Internet of Things (IOT), Machine Learning (ML), Cyber Physical System (CPS), Data Analytics हे परवलीचे शब्द अलीकडे आपल्या कानावर पडू लागले आहेत. त्यामुळे आपण सतत ट्रेनिंग घ्यायला हवं व आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांनाही द्यायला हवं. कॉम्प्यूटर स्किल्स आपल्याकडे असायला हवेत. अन्यथा आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ.
- १६) वैयक्तिक तुमचे स्वत:चे, संस्थेचे व एखादा निर्णय घेताना परिस्थितीचे SWOT Analysis करावे.
- १७) तुम्ही खातेप्रमुख झालेल्या दिवसांपासूनच ठरवायचं आहे की, माझा मुक्काम जास्त दिवस येथे नाही. काही वर्षातच मला MD/CEO/Unit Head/GM व्हायचंय. त्यामुळे तेव्हापासूनच या पदावर यशस्वीरीत्या काम करणाऱ्या व्यक्तींची (mentor) गुणवैशिष्ट्ये निरीक्षण करून स्वत:मधे उतरावयाला सुरुवात करा.
- १८) आपण जेव्हा चांगलं काम करतो, तेव्हा त्याची दखल कोणी तरी घेणं, पाठ थोपटणं, यामुळे आपला काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो. हे काम पुरस्कार देऊन VSI, NFCSF, DSTA, STAI, Bharatiya Sugar या संस्था करीत असतात. आपणास वाटत असेल, आपण नावीन्यपूर्ण काम केले आहे. तर जरूर आपला Biodata व केलेल्या कामांचा तपशील वरील संस्थांकडे पाठवावा. त्याचे मूल्यांकन होऊन पात्र उमेदवारांना पुरस्कार दिले जातात.
शेवटी आपणास सांगू ईच्छितो की, तुम्ही अशा पुस्तकांचे वाचन करा की जे तुम्हाला तुमचं Quality Life जगायला शिकवतील अशा पुस्तकांना Self Help Books असेही म्हणतात. उदाहरणदाखल मी आपणाला काही पुस्तकांची नावे सांगतो.
१. The Miracle Morning – Hal Elrod.
२. Die Empty- Todd Henry.
३. Think & Grow Rich – Nepoleon Hill
४. Atomic Habits – James Clear
५. Energize your Mind – Gaur Gopal Das.
हि पुस्तकं मराठीमध्ये भाषांतरित स्वरूपातसुध्दा उपलब्ध आहेत. ऑनलाईनदेखील मागवू शकता. या व्यतिरिक्त अनेक चांगली चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्हाला आवड निर्माण व्हावी म्हणून वरील चार पुस्तकांची नावे सांगितली आहेत.
असो! मी आपणास माझ्या अनुभवाचे दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य ते घ्यावे, अयोग्य ते सोडून द्यावे. होऊ घातलेल्या खातेप्रमुखांना व MD/CEO/GM/ युनिट्स हेड्स या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!