श्री दत्त इंडियाची फसवणूक, १० जणांना अटक

सातारा : एकाच वाहनाचे दोन वेळा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहत एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये सचिन नबाजी कोकरे (वय ३२), राहुल म्हाळसाकांत कोकरे (वय ३४), चालक जितेंद्र चंद्रकांत भिसे (वय २७), भाऊसो तात्याबा कोकरे (वय ३५), पांडुरंग विश्वनाथ सुतार (वय ३५), सुरज अशोक धायगुडे (वय २४, सर्व रा अंदोरी, ता. खंडाळा, ज्ञानेश्वर महादेव होळकर (वय ३४) सचिन महादेव होळकर (वय ३८) सर्व रा रुई ता खंडाळा व कारखान्याचे चिटबॉय दत्तात्रय भिवा भुजबळ (वय ५२) रा पिंपरे बुता खंडाळा व सुनील संपत पवार (वय ५२, रा. शेडगेवाडी, ता. खंडाळा) यांचा समावेश आहे. अनिता सचिन होळकर (रा. रुई, ता. खंडाळा) हिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
दत्त इंडियाच्या साखरवाडी कारखान्यामध्ये संशयित सुरज धायगुडे याने कारखान्याचे चिटबॉय, ट्रॅक्टर वरील वाहन चालक कारखान्याचा शेतकरी कोड असणारे शेतकरी यांच्याशी संगनमत करून कारखान्यात दि ४ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी काही ऊस वाहतूक ट्रॅक्टरचे दोनवेळा वजन केले. त्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठी फसवणूक टळली.