शंभर टक्के बायो इथेनॉलवरील गाड्यांचे उत्पादन सुरू : गडकरी

दोन महिन्यांत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणार–
नवी दिल्ली : टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनी १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. भारत पुढील दोन महिन्यांत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठेल, असेही त्यांनी जाहीर केले.
“पुढील दोन महिन्यांत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे हे लक्ष्य आम्ही साध्य करू. E20 (२० टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल) वापरल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनी १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चांगलाच दिलासा मिळेल’, असे गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
गडकरी म्हणाले, ‘प्रदूषण ही देशातील एक गंभीर समस्या आहे कारण जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये ४२ भारतीय शहरे आहेत. २०२४-२५ पुरवठा वर्षात ०.८८ अब्ज लिटर इथेनॉल पुरवण्यासाठीच्या त्यांच्या दुसऱ्या निविदेत तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पहिल्यांदाच सांगितले आहे की सहकारी साखर कारखान्यांमधून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलला प्राधान्य दिले जाईल, साखर उद्योगाने इथेनॉल-डिझेल, ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाकडे वळावे.’
“आपण २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, ज्यामुळे प्रदूषण देखील होत आहे,” असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये २० टक्के जास्त इथेनॉल-मिश्रित पेट्रोल सुरू केले होते. पहिल्या टप्प्यात १५ शहरे समाविष्ट करण्यात आली. ऊस, भात आणि इतर कृषी उत्पादनांपासून काढलेल्या इथेनॉलचा वापर केल्याने भारताचे क्रूड आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल’, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारत आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर ८५ टक्के अवलंबून आहे.
E20 चा वापर केल्याने E0 (स्वच्छ पेट्रोल) च्या तुलनेत दुचाकींमध्ये कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जनात सुमारे ५० टक्के आणि चारचाकी वाहनांमध्ये सुमारे ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२२ च्या लक्ष्य तारखेपेक्षा खूपच आधीच, म्हणजे जून २०२२ मध्ये सरासरी १० टक्के मिश्रण साध्य करण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.