अडचणीवर मात करून एफआरपीप्रमाणे बिले दिली -पाटील

गणपतराव पाटील : ‘दत्त शिरोळ’च्या गळीत हंगामाची सांगता
कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. एकूण साखर उत्पादन व बाजारात साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसताना आणि आर्थिक अडचणीतूनही एफआरपी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने बिले दिली, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव दादा पाटील यांनी दिली.

५१ वा ऊस गळीत यशस्वीरीत्या पार पडला. हंगाम १२७ दिवस चालला. या हंगामात ११,४८,६७५ मे. टन उसाचे गाळप होऊन १२.१७ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १२,३३,६८० पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे. कारखान्याने राबविलेल्या विविध ऊस विकास योजना व सभासदांना केलेले मार्गदर्शन यामुळे या हंगामात हेक्टरी सरासरी ९९.६० मे. टन उत्पादन मिळाले आहे. कारखान्याने या हंगामात एफआरपीप्रमाणे प्रतिटन रूपये २९५० प्रमाणे रक्कम विनाकपात सभासदांना दिली, असे पाटील यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. राजाभाऊ शिरगुप्पे, अशोकराव निर्मळे, राऊ पाटील, व्ही. व्ही. शिंदे, संजॉय संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अरुणकुमार शंकर देसाई, सर्व संचालक, आदी उपस्थित होते. कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब बनगे यांनी आभार मानले.