मृत कामगाराचा मृतदेह कारखान्याच्या गेटवर

कोल्हापूर : दौलत – अथर्व साखर कारखान्याचे जखमी कामगार गुंडू रामू पाटील ( वय ५१, रा. ढेकोळेवाडी ता. चंदगड) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत दिली जाईल, असे कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला पाटील यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पाटील हे गेल्या १७ जानेवारी रोजी कारखान्यात ड्रेन व्हॉल्व्ह ओपन करत असताना बारा फूट उंचीवरून खाली पडून जखमी झाले होते.
ढेकोळी ग्रामस्थांनी कारखान्यावर मृतदेह आणला व नुकसान भरपाई मिळाल्यानंतरच अंत्यसंस्कार करणार असल्याची भूमिका घेतल्याने कारखान्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामस्थांनी काररखाना कार्यस्थळावर गर्दी केली. मृतदेह कारखाना गेटवर ठेऊन जमावाच्या मदतीने कारखाना बंद केला. रात्री उशिरापर्यंत कारखाना व्यवस्थापन आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. मृताच्या नातेवाईकांना योग्य ती मदत करू, असे कारखाना प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र, कोणीच ऐकायला तयार नसल्याने रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरूच होती. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
.
गुंडू पाटील अनेक वर्षांपासून कारखान्याच्या उत्पादन विभागात काम करत होते.