साखर कामगारांच्या महागाई भत्त्यात घट

पुणे : राष्ट्रीय महागाई निर्देशांकात अल्प घट झाल्यामुळे, सहकारी साखर उद्योगातील कामगारांचा महागाई भत्ता देखील थोडा कमी होणार आहे. याबाबतचे पत्रक महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्धीस दिले आहे. येत्या १ जुलैपासून कामगारांना कमी वेतन मिळेल.
महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखाना संघाशी संलग्न साखर कारखान्यांतील कामगारांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) १ जुलै, २०२५ पासून अखिल भारतीय सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित बदल करण्यात आले आहेत.
मागील तिमाही (एप्रिल ते जून २०२५) साठी महागाई भत्ता रु. ७४६७.५० इतका देण्यात येत होता. नवीन तिमाही (जुलै ते सप्टेंबर २०२५) साठी सरासरी निर्देशांक २,५२९ अंश इतका असून, तो मागील तिमाहीच्या (२,५७५ अंश) तुलनेत ४६ अंशांनी कमी झाला आहे.
या निर्देशांक घटमुळे, महागाई भत्त्याच्या रकमेत घट झाली आहे. १ जुलै, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या तिमाहीसाठी महागाई भत्ता रक्कम रु. ७३३४.१० इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम मागील तिमाहीच्या तुलनेत रु. १३३.४० ने कमी झाली आहे (रु. ७४६७.५० – रु. ७३३४.१० = रु. १३३.४०).