वसाका सुरू करण्यासाठी दि. २५ पासून उपोषण

नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) पुन्हा सुरू करण्यात यावा, यासाठी कारखान्यातील आजी-माजी कामगारांनी येत्या बुधवारपासून ( दि. २५ ) बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वीच काही कामगार व महिलांनी देवळा येथील शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर धरणे आंदोलन केले होते; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी अनेकवेळा निवेदने, आंदोलने आदी मार्ग अवलंबले जात असले तरी याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
दरम्यान, येत्या २५ जूनला सकाळी ११ वाजता कामगार, महिला व परिसरातील सभासद या लक्षवेधी उपोषणास सहभागी होत ‘वसाका’ सुरू करण्यासाठी निर्वाणीचा इशारा देणार आहेत. नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादक संघर्ष समितीनेही या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा दिला असल्याचे सांगण्यात आले. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शासनाचे व शिखर बँकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी जास्तीत जास्त सभासद व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक कामगार शशीकांत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक तथा कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, जमिनधारक शेतकरी नानाजी पवार, दोधा पवार, आणा गुंजाळ, मुन्ना शिंदे, सुनिल आहीरे, संजय देशमुख, संजय जगताप, विनायक जाधव, गणु शिंदे, बापू देशमुख, सुभाष निकम आदी सभासद व कामगारांनी केले आहे.