अखेर दीपक तावरे यांना मिळाली मनासारखी पोस्टिंग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्याच्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी दीपक तावरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मनासारखी पोस्टिंग मिळाल्याने त्यांनी नवा पदभार स्वीकारला.
तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी व सहकारचे अपर आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्याकडे देण्यात आला होता.
आता तावरे यांच्या नियुक्तीने सहकार आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कामकाजास गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तावरे यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन मुंबई येथे राज्य कामगार विमा योजनेच्या आयुक्तपदी १३/११/2०१३ रोजी बदली झाली होती. पण त्यांनी तो पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची पुण्यात ‘यशदा’च्या उप महासंचालकपदी ३/४/२०२४ रोजी बदली करण्यात आली. मात्र या पदावरही ते रूजू झाले नाहीत.

त्यामुळे शासनाने त्यांची नियुक्ती 27 मे रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे या रिक्त पदावर केली. हे पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करुन ही नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काढले आहेत. तसेच ते कोठे रूजू झाले नव्हते, हा कालावधी रजेचा कालावधी म्हणून गृहित धरण्यात आला आहे.

अत्यंत सक्षम आणि प्रमाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्री. तावरे यांना अखेर त्यांच्या मनाप्रमाणे पद मिळाले आहे. सहकार खात्यातून आयएएस श्रेणीत निवड झालेले ते पहिलेच अधिकारी आहेत.

तावरे हे मूळ सहकार विभागातीलच ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी सहकार विभागात यापुर्वी विविध पदे भूषविली आहेत. पुणे विभागीय सह निबंधक, साखर सह संचालक या पदावर त्यांनी काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांची राज्याच्या पणन संचालक पदी नियुक्ती झाली होती. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पदही त्यांनी भूषविले. त्या नंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली. त्यांच्या कारकिर्दीत महामंडळाने समृध्दी महामार्गावर लॉजिस्टिक पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »