कारखाना तर चालवावा लागणार, अफवा नका पेरू!

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांचे पॅनल अद्याप अंतिम न झाल्यामुळे, काही कारखान्यांनी अतिरिक्त कार्यभार अन्य जबाबदार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे, कारण आम्हाला कारखाना सूरू ठेवायचा आहे, कार्यकारी संचालक किंवा एमडी सरकारकडून मिळत नाही, यात आमचा दोष नाही, अशा भावना साखर उद्योगातून व्यक्त होत आहेत.
नियमित एमडी नसल्याने कारखान्यांचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन अडचणीत येणार, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. त्यात तथ्य नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. या तात्पुरत्या व्यवस्था आहेत. एमडी मिळत नाही म्हणून कारखाने बंद ठेवायचे का, असे सहकारी साखर उद्योगाचे म्हणणे आहे. नियमित एमडी नाही म्हणून काही कारखान्यांच्या कर्जप्रक्रिया थांबल्या आहेत, या वेगळ्याच व्यथा आहेत.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालक पदाचे पॅनेल (एमडी पॅनेल) अद्यापही अंतिम झालेले नाही. त्यामुळे 107 सहकारी साखर कारखान्यांत सद्यस्थितीत जुन्या एमडी पॅनेलवरील 69 जण कार्यरत आहेत. 38 सहकारी साखर कारखान्यांच्या एमडी पदाचा अतिरिक्त पदभार सोपवून काम सुरू ठेवले आहे.
एमडी परीक्षेला बसलेले काही उमेदवार न्यायालयात गेले, त्यांचा तो अधिकार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने एमडी पॅनल अंतिम होण्यास विलंब होत आहे, या प्रक्रियेशी सहकारी साखर कारखान्यांचा काहीही संबंध नाही. आम्ही केलेली तात्पुरती व्यवस्था चांगलीच आहे. कारखाना सुरू ठेवण्यासाठी ती आवश्यक आहे, असे या क्षेत्राचे म्हणणे आहे.