साखरेसाठी द्विस्तरीय दर पद्धती करा : ‘जय शिवराय’ची मागणी
कोल्हापूर : साखरेचा विक्री दर 45 रुपये करावा, घरगुती 20 टक्के लागणाऱ्या साखरेचा दर वेगळा व औद्योगिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेचा दर (द्विस्तरीय दररचना) वेगळा करावा आदी मागण्या जय शिवराय किसान संघटनेने केल्या आहेत.
साखरेचा विक्री दर 45 रुपये करावा, घरगुती 20 टक्के लागणाऱ्या साखरेचा दर वेगळा व औद्योगिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेचा दर (द्विस्तरीय दररचना) वेगळा करावा सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोडीबाबत क्रम पाळीचा वापर काटेकोरपणे करावा, प्रत्येक वर्षी वाढीव उत्पादन खर्चाचा समावेश एफ आर पी किंमत निश्चित करताना करावा आणि साखरेचा वेगळा व प्रत्येक उप पदार्थांचे अहवाल वेगवेगळे सादर करून, त्याचा हिशेब द्यावा व त्यातील रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागण्यांसाठी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना, दत्त दालमिया शुगर आसुर्लं पोर्ले, कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे यांना निवेदन देण्यात आले.
वरील मागण्यांचे ठराव येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये करून सरकारला पाठवावेत, तसेच ऊस तोडणी साठी मजुरांनी पैसे मागितले तर, त्याची रक्कम मजुरांच्या बिलातून वसूल करून ती संबंधित शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वरील सर्व मागण्यांबाबत कुंभी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके साहेब, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, वारणा साखर कारखान्याचे संचालक उदय पाटील व कार्यकारी संचालक भगत, दत्त आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याचे शेती अधिकारी गोसावी व देसाई यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशी संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, गुणाजी शेलार, युवराज आडनाईक, नामदेव पाटील, तातोबा कोळी, शिवाजी सिद, शितल कांबळे, सतिश कोळी,सागर माळी आदी उपस्थित होते.