कापूस,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई – मुंडे
राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे आदेश
मुंबई : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावे, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
यासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा व नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
36 लाख शेतकऱ्यांची KYC पूर्ण
राज्यात कापूस व सोयाबीन खातेदारांची एकूण संख्या 96.17 लाख आहे. त्यापैकी 75.31 लाख शेतकऱ्यांचे क्षेत्रीय स्तरावर संमती पत्रे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 64.87 लाख खातेदार शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे. त्यापैकी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या डाटा सोबत 46.8 लाख शेतकऱ्यांचा डाटा जुळला आहे. तर ई पीक पाहणी नावांच्या डेटा पैकी 36 लाख नावे जुळलेली आहेत. त्यामुळे 10 लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत. हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.
सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावेत-मुंडे
केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव घोषित केले आहेत. यावर्षी सोयाबीनचे 73.27 लाख मेट्रिक टन इतके बंपर उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून नाफेड व एनसीसीएफ मार्फत सोयाबीन खरेदीचे केंद्रे उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत. राज्य शासन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे प्रतिपादन कृषिमंत्री मुंडे यांनी या बैठकीत केले.
गांधी जयंती दिवशी तालुकास्तरीय मेळावे
कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.
कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यातील मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदृष्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विजयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, आत्मा प्रकल्प, कृषी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मिळावे आयोजित करून प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यावे यासाठी येत्या महात्मा गांधी जयंतीला राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर हे मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे ही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.