DSTA नियामक परिषदेवर दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड

पुणे— साखर आणि जैवऊर्जा उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि शुगर बायोएनर्जी फोरम (IFGE) चे सह-अध्यक्ष दिलीप पाटील यांची प्रतिष्ठित डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
निवडीनंतर पाटील म्हणाले, “DSTA चे ध्येय पुढे नेण्यासाठी, म्हणजे नवीन साखर तंत्रज्ञान आणि चांगल्या उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”
साखर उद्योगातील दमदार कारकीर्द
पाटील यांना कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम केल्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या काळात त्यांनी नवीन तीन इथेनॉल प्रकल्प व साखर कारखाना विस्तारीकरण करून कारखान्याची क्षमता वाढविली आधुनिक तंत्रज्ञान वापरले आणि कामकाजात सुधारणा केल्या.
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) अंतर्गत शुगर बायोएनर्जी फोरमचे सह-अध्यक्ष म्हणून, पाटील यांनी साखर उद्योगात प्रदूषण न करणाऱ्या ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.
DSTA मध्ये त्यांनी साखर बनवण्याचे एकदम नवीन तंत्रज्ञान, तंत्रज्ञांमध्ये माहितीची देवाणघेवाण वाढवणं आणि पर्यावरणाची काळजी घेऊन उत्पादन करण्याच्या पद्धतीवर भर देणार असल्याचं सांगितलं आहे.
डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशन ही साखर उद्योगात तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी काम करणारी संस्था आहे.
महाराष्ट्रातील साखर उद्योग आपल्या ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या या क्षेत्रातील प्रगती साठी तांत्रिक प्रगतीवर जास्त भर दिला जात असल्यामुळे, पाटील यांच्यासारखे उद्योगातील तज्ञ या क्षेत्राला नवीन तंत्रज्ञानाचा साखर उद्योगात स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणीबाबत निश्चितच मार्ग दाखवतील अशी अपेक्षा आहे.
DSTA ची नियामक परिषद तंत्रज्ञान विषयक धोरणात्मक शिफारशी तयार करणे, तांत्रिक कार्यक्रम आयोजित करणे आणि साखर तंत्रज्ञांसाठी व्यावसायिक विकासाचे कार्यक्रम चालवणे यासाठी काम करते.