‘ज्ञानेश्वर’ १७ कोटींच्या ठेवी सभासदांना परत करणार

नगर : सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात प्रति टन १०९ रू. प्रमाणे ठेव म्हणून घेतलेले सुमारे १७ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांना परत देण्यात येतील, असा ठराव लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने केला आहे.
कारखान्याने मागील गळीत हंगामातील देयक १०९ रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले. ती रक्कम आसवणी विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पासाठी ठेव म्हणून ठेवल्याचा सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या वार्षिक साधारण सभेत ठराव केला. त्याला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विरोध केला होता.
हे प्रकरण साखर आयुक्त यांच्याकडे गेल्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर सहसंचालक यांची समिती नेमली होती. याबाबत चार सदस्यीय समितीसमोर सुनावणीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच, साखर कारखाना व्यवस्थापनाने संचालक मंडळाच्या मासिक सभेत निर्णय घेऊन ज्या ऊस उत्पादकांना सदरची रक्कम हवी आहे. त्यांनी लेखी अर्जाद्वारे मागणी केल्यास कारखान्याचे आर्थिक उपलब्धता परिस्थितीनुसार ही रक्कम संबंधित ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असा निर्णय घेतला.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे एकूण १७ कोटी रुपये त्यांची संमती न घेता कपात केले होते, असा आरोप करण्यात आला होता. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर सभासदांना दिलासा मिळाला आहे.