हा कारखाना ठरला सर्वात कमी ऊसतोड-वाहतूक खर्च कपात करणारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यांचा राज्यासमोर आदर्श

धाराशिव : ‘एफआरपी’ रकमेतून ऊसतोड आणि वाहतूक खर्च कपात केली जाते, हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड आणि वाहतूक खर्चात सर्वात कमी कपात करून शेतकऱ्यांचा फायदा केला आहे. अल्प दरातही हे काम होऊ शकते, हे स्वत: दाखवून, कारखान्याने राज्यातील अन्य साखर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Arvindrao Gore

चेअरमन अरविंदराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतिपथावर आहे. मागील वर्षीच्या हंगामात या खर्च कपातीत आंबेडकर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. ऊसतोड आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ ५४९ रूपये ८० पैसे एवढी खर्च कपात करण्यात आंबेडकर कारखान्याला यश आले आहे. सर्वात कमी खर्च कपात करणार्‍या राज्यातील पाच कारखान्यांपैकी धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकर आणि नॅचरल शुगर या दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एफआरपी मिळाली आहे.

प्रचलित ऊस तोडणी आणि साखर कारखान्यापर्यंत वाहतुकीपोटी आलेला खर्च ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांच्या देख ‘एफआरपी’ तून वजा केला जातो. गतवर्षी खर्च करण्यात आलेल्या ऊसतोडणी व वाहतूक खर्च कपातीची माहिती राज्यातील शेतकर्‍यांना व्हावी, यासाठी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे माहिती जाहीर केली आहे. राज्यातील सहकारी, खासगी कारखान्यांचे कारखानानिहाय खर्चकपातीची रक्कमच साखर आयुक्तांनी घोषित केली आहे.

राज्यात मागील वर्षीच्या हंगामात सर्वात कमी ऊसतोड आणि वाहतूक खर्च कपात करणार्‍या राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रिलायबल शुगर अ‍ॅन्ड डिस्टलरी पॉवर लिमिटेड यांनी शेतकर्‍यांच्या देय रकमेतून वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी १२१८ रूपये अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर प्रा. लि. ने 1146 रूपये, भंडारा येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजने १०८२ रूपये, नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर लिमिटेडने १०६१ रूपये तर छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर शुगर प्रा. लि. या कारखान्याने १०५५ रूपये इतकी प्रति टन शेतकर्‍यांच्या एफआरपीमधून खर्चकपात केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.६१ टक्के आणि प्रतिटन एफआरपी ३१५९.८० आहे. त्यातून ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ ५४९.८० रूपये वजा करून शेतकर्‍यांना प्रतिटनास २६१० रूपये एवढा चांगला दर दिला आहे, असे साखर संचालक यशवंत गिरी (अर्थ) यांनी सांगितले.

सर्वात कमी ऊसतोडणी व वाहतूक खर्चकपात करणारे कारखाने

  • धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना प्रतिटन ५४९.८० खर्चकपात
  • अहदमनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी सा. का. प्रतिटन ६२१.२५ खर्चकपात
  • कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६२६.५२ रुपये खर्चकपात
  • धाराशिव जिल्ह्यातील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रतिटन ६३९.२२ रुपये खर्चकपात
  • सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखाना प्रतिटन ६५६.२८ रुपये खर्च कपात
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »