डॉ. मुळीक सरांचा शासनाने समयोचित गौरव करावा

– छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार (सातारा)
आदरणीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तानाजी, येसाजी, चिमाजी, गुणोजी, राणोजी, बहिर्जी, हिरोजी, बाजी, मदारी, अश्या अनेक ऐतिहासिक नावांचा वजनदारपणा ज्यामध्ये सामावलेला आहे, असे आजच्या काळातले आंतर्राष्ट्रीय पातळीवरील एक भारदस्त महाराष्ट्रीयन नांव म्हणजे– बुधाजी….!

ज्यांच्या नावामधूनच ऐतिहासिक जाणीवा जागृत होतात, त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आदरयुक्त ऋणानुबंध नसते तर नवलंच म्हणावे लागले असते. हा आदरयुक्त स्नेहभाव ऐतिहासिक काळापासून नियतीनेच करुन दिलेला असावा. या पार्श्वभूमीवर आज आम्हास पितृतुल्य असणा-या आदरणीय डॉ. श्री. बुधाजीराव मुळीक या शेती शास्त्रज्ञाचे ह्दयस्थ अभिष्टचिंतन करताना आमचे मन समाधानंदाने भरुन येत आहे.
नावांत काय आहे असे काही म्हणतात, पण नावामध्येच ज्याची त्याची ओळख लपलेली असावी. बुध-बृहस्पती या दोन परोपकारी शुभ परिणामकारक ग्रहांमधील बुध ग्रहावरुन, बुधाजी असा एक तार्किक अर्थ बुधाजी या नावामध्ये दडलेला आहे.
ज्ञान, उद्यमशीलता, बुध्दी अश्या अनेक बाबी बुध ग्रहाशी संबंधीत आहेत. स्वकर्तृत्वाने ज्यांनी बुद्धिमत्ता, ज्ञान संपन्नता, चारित्र्य संपन्नता, उर्जा- उत्साह आणि उद्यमशीलता याच गुणांचा विकास केला आणि नेहमीच काळ्या मातीची पर्यायाने शेतक-यांची विविध माध्यमातून सेवा करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच सतत कार्यमग्न असणारे आमचे गुरुवर्य बुधाजीराव मुळीक सर!

शेतकरी कुटुंबात त्यापेक्षाही शेतीचे म्हणजेच काळ्या आईचे उपकार डोळसपणे मानणा-या मध्यम-सधन कुटुंबात गुरुवर्य डॉ. बुधाजीराव मुळीक सरांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यात झाला, त्यास आज 27 सप्टेंबर 2021 रोजी 80 वर्षे पूर्ण होत आहेत. सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग घडून येत आहे. त्यांची जन्मभूमी कोल्हापूर असली तरी कर्मभूमी पुण्यनगरी राहिली आहे. पुणे तेथे काय उणे! कोल्हापूरच्या मातीमधील नम्रता, शालीनता, उदारता, पराक्रम आणि पुण्यनगरीचा चिकित्सकपणा- स्वयंशिस्त, सामाजिक समरसता या सद्गुणांचा संगम डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर यांच्या व्यक्तित्वामध्ये सामावल्याचे दिसून येतो. स्वार्थ कोणाला नाही़? स्वार्थ नाही तो माणूस नाही तर तो संतच म्हणावा लागेल. या मातीचे ऋण समजून ज्या व्यक्ती आपले जीवन समाजासाठी समर्पित करतात. परोपकार, परमार्थ साधण्याचा मनस्वी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करतात अश्या दुर्लभ व्यक्तींमत्वामध्ये आदरणीय डॉ.बुधाजीराव सरांचे नांव अग्रस्थानीच असणार आहे.
आजकाल स्वबळाची चर्चा फार आढळून येते. त्यामुळे स्वबळ आणि परबळ म्हणजे काय हे सर्वांनाच आता ठाऊक झाले आहे. दुर्बळही स्वबळाची भाषा करताना मिळू शकतो; परंतु कृषिरत्न-कृषीभूषण डॉ. बुधाजीराव यांनी, आपले माध्यमिक शिक्षणापासून ते ॲग्रीकल्चरल सायन्सची पदवी, त्याही पुढे ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग आणि त्याच क्षेत्रात पीएच. डी. मिळवताना, जवळजवळ संपूर्ण किंवा निम्म्याहुन अधिक शिक्षण शिष्यवृत्तीवर म्हणजेच विद्वत्ताक्षमतेवर पूर्ण केले. डॉक्टरेट मिळवण्यासाठी कुटुंबासह अमेरिकेमध्ये राहण्यास परवानगी आणि शिष्यवृत्ती त्यांना मंजूर करण्यात आली होती.
डॉक्टरांच्या या प्रसंगावरुन, अमेरिकन फॉरेन स्कॉलरशिपचं एक प्रेरणादायी आणि दुर्मिळ उदाहरण म्हणून बघावे लागेल. स्वबळावर शिक्षण आणि डॉक्टरेट मिळवणारे देशात फक्त एकमेव डॉक्टरसाहेबच असावेत यात आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. डॉ.बुधाजीराव मुळीक यांच्या कृषी व्यासंगाचा आवाका, शैक्षणिक जिद्द, अफाट बुध्दीमत्ता यावरुन स्वसामर्थ्य म्हणजे काय याची प्रचिती आपल्याला येवू शकेल.
किमान 30-35 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये विविध अभ्यासदौरे, प्रासंगिक दौरे यशस्वीरित्या केलेल्या डॉक्टर श्री. बुधाजीराव मुळीक यांना कृषीक्षेत्राबरोबरच हरितक्रांती आणि कृषी अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान या विषयांचा प्रचंड अभ्यास आहे. इतक्या थोर योग्यता आणि क्षमतेचा महाराष्ट्रातील सुपुत्र, संपूर्ण भारत देशात आजच्या घडीला दुर्मिळ आहे.
सुमारे 100 पेक्षाही जास्त आंतर्राष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदा, मेळावे, चर्चासत्रे यामध्ये त्यांनी सक्रीय भाग घेऊन, अनेक कृषीविषयक सुधारणा लागू करण्यास त्यांनी गेल्या सुमारे चार दशकांत वेळोवेळी शासनाला प्रवृत्त केले आहे. शेती उत्पादनात संपूर्ण जगात अव्वल असलेल्या ब्राझील देशासह अनेक देशांचा आणि सुपरपॉवर देशांचा कृषी अभ्यास त्यांनी केला आहे. कृषी सेवा भास्कर म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो यावरुन त्यांची महानता दिसते.
भारतात, संपूर्ण देशात ‘ईर्मा’ योजना लागू करावी ही मागणी सर्वप्रथम त्यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली भूमाता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शेतक-याला त्यांच्या शेतातील उत्पादन क्षेमतेवर जर नुकसान झाल्यास, ठराविक ‘ॲश्युअर्ड’ रक्कम विमा योजनेच्या माध्यमातून प्रदान करण्यात यावी अशी व्यावहारिकदृष्टया परिपूर्ण योजना म्हणजे ‘ईर्मा’ योजना आहे. उदाहरणार्थ जर ज्वारी एका एकरात लावली तर ती किती आली याचे सर्वेक्षण होईल व त्यास येणा-या उत्पादन खर्चावर आधारित नफा समाविष्ट करुन, तितकी रक्कम त्यास वायदे बाजारात, बाजार समितीत ती ज्वारी विकून मिळाली नाही तर त्याच्या फरकाच्या रक्कमेची पूर्तता विमा रिस्क योजनेमधून शासन करेल असे स्वरुप ढोबळ मानाने ‘ईर्मा’ योजनेचे आहे असे म्हणता येईल.
‘ईर्मा’ योजनेच्या बदल्यात सध्याची खतावरील आणि तत्सम अनुदाने कमी केली तरी चालतील परंतु ‘ईर्मा’ योजना लागू करा, त्यामध्ये भारतीय शेतक-यांचे हित आहे असे कळकळीने ते विविध स्तरावरुन मांडत आलेले आहेत. त्यासाठी त्यांची कोणाशीही चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु चर्चेला आपण टिकू की नाही या भयगंडामुळे कोणी पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
ईर्मा योजना (Income Risk Management in Agriculture) लागू होणेबाबत त्यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला सकारात्मक होकार लवकरच मिळेल अशी आशा आणि उत्कट इच्छा आहे. सातारा जिल्हयाची पर्जन्य दृष्टीकोनामधून असेलेली विविधता, म्हणजेच पश्चिमेकडे भरपूर पाऊस आणि पूर्वेकडे अवर्षण, डोंगराळ आणि सपाट भुपृष्ठभागाचे असलेले वैशिष्ट, जिल्यातील असलेली जैवविविधता तसेच सातारा जिल्हयात असलेली 11 लघु-मध्यम-मोठी धरणे यांचा विचार करता, ‘ईर्मा’ योजनेचा , पायलट प्रोजेक्ट सातारा जिल्हयात राबवावा, अशीही त्यांनी मागणी आहे. सातारा जिल्हयातील रांगडया बळीराजाच्या कल्याणाची त्यांची मागणी, त्यांचा अभ्यासूपणा आणि सातारा जिल्हयावर त्यांचा असणारा स्नेह स्पष्टपणे अधोरेखित करते.
कृषीक्षेत्राला आणि कृषी पुरक व्यवसायांना, उदयोगाचा दर्जा दयावा अशीदेखील त्यांची प्रमुख मागणी आहे. जगाचा पोशिंदा असणा-या बळीराजाची आर्थिक घडी नीट बसवली तर शेतक-यांच्या आर्थिक कारणाकरिता होणा-या आत्महत्या तर थांबतीलच; शिवाय भारताची अर्थव्यवस्था सुदृढ सक्षम होईल, असा ठाम विश्वास त्यांच्याकडे आहे. भारताला जागतिक महासत्ता होणे साकारायचे असेल तर कृषी धोरणामध्ये सकारात्मक बदल घडवून, मजबुत कृषी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे अशी त्यांची धारणा आहे.
त्यांच्या बौध्दिक आणि वैचारिक प्रगल्भतेचा विचार करता, वेळोवेळी आणि योग्य त्या कारणासाठी प्रसंगी बंडाचा पवित्रा देखील घेण्यास ते जराही कचरलेले नाहीत हे आपल्याला काही उदाहरणावरुन कळून येईल. बंडाचा झेंडा हातात घेतल्यावर सत्ताधारी कोणीही असो, सर्वजण आदराने डॉक्टर साहेबांच्याकडे कोणतातरी पदर लावून, डॉक्टरसाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे; परंतु त्यामध्ये अमूक ही अडचण आहे, पक्षीय धोरणांची मर्यादा आहे असे काही-बाही कथन करत, भावनिकतेची जोड देऊन अनेकजण जोडे झिजवताना कित्तेकांनी बघितले आहे. कोल्हापूरी फेटा, तसेच पुणेरी पगडी आणि फुले पगडी यांचा उत्कृष्ट मिलाप त्यांच्या सदा सर्वकाळ उत्साहाने भारलेल्या व्यक्तित्वामध्ये पाहायला मिळतो.
आजपर्यंतच्या या कृषीक्षेत्रातील प्रवासामध्ये त्यांना शेकडयांच्या संख्येने, मानाचे, प्रतिष्ठेचे, जन्मभी आणि कर्मभूमीतील, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील, शासन स्तरावरील आणि अशासकीय संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
गेल्या सुमारे दोन वर्षांच्या प्रतिकुल परिस्थितीत डॉ.बुधाजीराव मुळीक सरांनी शेतकरी जगला पाहिजे आणि इतरांना अन्नधान्य मिळाले पाहिजे या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यांनाही शेती उत्पादन पुरवले गेले आहे. यामागे डॉ. बुधाजीराव मुळीक सर यांचे योगदान नाकारता येणारे नाही. गरजेच्या काळात, बळीराजाने पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचे ऋण म्हणून बळीराजाचा सुयोग्य प्रतिनिधी म्हणून राज्याचा सर्वोच्य नागरी पुरस्कार देऊन डॉ.बुधाजीराव मुळीक सरांचा शासनाने समायोचित गौरव करावा, अशी आमची मागणी आहे.
शेती किंवा कृषीक्षेत्राबरोबरच डॉक्टरांच्या मध्ये एक अर्थतज्ज्ञही सामावलेला आहे. देशाचा जीडीपी दर, उत्पादन स्वयंपूर्णता, उद्योग चालना, रिझर्व्ह बॅन्केचे रेपो रेट, सहकार, भांडवली गुंतवणूक-नगदी गुंतवणूक इत्यादीबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे. हिंदी, मराठी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांवरील उच्च कोटीचे प्रभुत्व त्यांनी मिळवलेले आहे. या सर्व बाबी सहजासहजी साध्य होणा-या नाहीत. डॉक्टरसाहेब महाराष्ट्राच्या मातीमधील लखलखता हिरा आहेत.
दुदैवाने पिकते तिथे विकत नाही हे खरे आहे. आपल्याच व्यक्तींचे खुलेआम कौतुक खरोखरच कुणी करेल याचा भरवसा निदान आम्हाला तरी राहिलेला नाही. तथापि याचा गांभीर्यांने विचार प्रत्येकाला करावा लागेल. काहीही असेल तरी डॉ. बधाजीराव मुळीक यांचा मुख्यत्वे कृषी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात असलेला बौध्दिक दबदबा स्वबळाचा, स्वनिर्धाराचा, भूमातेचा आणि स्वयंभू आहे याचा आम्हाला अभिमानच नाही तर नम्रतापूर्वक गर्व आहे.
डॉक्टरांचा स्वभाव सुधारणावादी आहे. सुधारणावादी विचार मांडताना जुने सर्वंच गुंडाळून ठेवून, पुरोगामी अंधानुकरण करणे हा बुधाजीरावांचा स्वभाव नाही. जुन्यापैकी जे जुने चांगले आहे ते बावन्नकशी सोने अशी त्यांच्या विचारांची पठडी आहे. सेंद्रीय शेती, सामूहिक शेती, तुकडेबंदी या विषयीही सुधारणांचे डॉ.बुधाजीराव पुरस्कर्ते ठरतात. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या अश्या मराठमोळया पूज्यनीय व्यक्तीचा देशाने, देशातील नागरिकांकरीता उपयोग करुन घेतला पाहिजे. डॉक्टरांसारखा माणूस राज्यपाल पदावर असल्यास, त्या राज्याचे कृषी धोरण कधीच निश्चितच इतर राज्यांच्या तुलनेत उजवे राहील असा आम्हास दृढ विश्वास आहे.
डॉ. बुधाजीरावांनी सर्व दुनिया बघितलेली आहे. त्यांचे जे काही आहे ते आता त्यांचं म्हणून राहीलेलं नाही. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सार्वजनिक जीवनासह व्यक्तिगत जीवनामध्ये ते पूर्ण समाधानी आहेत. ज्या कुळात जन्म झाला त्या कुळाच्या परंपरेनुसार त्यांचे दोन्ही हात देण्यासाठी ते सज्ज आहेत. घेणारा मात्र तितक्यात तळमळीचा आणि जिगरबाज असला पाहिजे.
डॉक्टर साहेबांचा पितृतुल्य सहवास आम्हास नेहमीच लाभत आला आहे. त्यांच्या विषयी कृतज्ञतापूर्वक सांगण्यासारखे आणि अतिशय दुर्मिळ व अनपेक्षित म्हणावे लागतील, असे व्यक्तिगत प्रसंग भरपूर आहेत; परंतु ते अनुभव या ठिकाणी नमूद करण्यास प्रशस्त व समयोचित वाटत नसल्याने ते जाणीवपूर्वक टाळत आहे. मात्र कोणत्याही प्रसंगी आमच्या पाठीशी डॉक्टरसाहेब आणि भूमाता परिवार भरभक्कमपणे उभा राहिला आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. आमच्या थोरल्या भगिनीसमान असलेल्या डॉ.बुधाजीराव मुळीक त्यांच्या पत्नी आणि सर या दोहोंचे आमचे घराण्याशी वैयक्तिक-घरगुती संबंध राहिले आहेत. येथून पुढेही गुरुवर्य, पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून आम्हास त्यांच्याविषयी असलेला आदर व सहवास उत्तरोत्तर वृध्दींगतच होत राहील.
माननीय डॉ. बुधाजीराव मुळीक सर गौरव गंथ समितीचे चेअरमन आणि सर्व समिती सदस्य यांनी आम्हास या गौरव ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टरांच्या विषयी आमच्या भावना व्यक्त करण्याची विनंती सूचना करुन, संधी दिली. त्यामुळे आम्हास आमच्या प्रांजळ भावना मांडता आल्या, त्याबद्दल गौरव समितीचेही मन:पूर्वक आभार.
पुन्हा एकदा ऋषितुल्य, आदरणीय डॉ. बुधाजीराव मुळीकसाहेबांचे कृतज्ञतापूर्वक अभिष्टचिंतन. सरांचा, शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यास सर्वांना संधी मिळावी, अशी आई श्री जगदंबेच्या चरणी विनम्र प्रार्थना करुन आमचे मनोगतास विराम देताना, गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळयास आमच्या शुभकामना..
जयहिंद- जय महाराष्ट्र, जय भूमाता.
लेखनसीमा…
(वरिष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार यांनी संपादित केलेल्या ‘कृषिमहर्षी’ या ग्रंथातून साभार)