साखर आयुक्तांना शुभेच्छा
आगामी गळीत हंगाम, म्हणजे 2023-24 ची तयारी सुरू झाली आहे. करार – मदार सुरू आहेत. मिल रोलरचे पूजन धडाक्यात सुरू आहे. नवे हार्वेस्टरही येऊ घातले आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहेत. बर्याच साखर कारखान्यांनी हार्वेस्टर खरेदीची इच्छा प्रकट केली आहे. विस्तारीकरणाची कामे पूर्ण होत आहेत. या धामधुमीत राज्याला नवे साखर आयुक्त मिळाले आहेत, डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार. ते 2008 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांची अद्याप बरीच कारकीर्द बाकी आहे. योगायोग असा की, त्यांचा वाढदिवस हा (26 ऑक्टोबर) गळीत हंगाम ऐन भरात असतानाच येतो.
साखर उद्योग क्षेत्राला नवी दिशा देऊन शेखर गायकवाड निवृत्त झाले. त्यांच्या कार्यशैलीचे एवढे कौतुक झाले की, ‘शेखर आणि साखर’ असे समीकरणच बनले होते. खरं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यास ते निवृत्त झालेत असे अजिबात वाटत नाही. केवळ वयच नव्हे, तर ऊर्जा, धडाडी, परिश्रमाची तयारी आदी सर्व त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नक्कीच चालून येईल, यात शंका नाही. तसेच संकेत मिळत आहेत.
नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिक पालिकेच आयुक्त असताना, त्यांनी नवनवीन प्रयोग केले.
डॉ. पुलकुंडवार यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम बघत होते. समृद्धी महामार्गांसाठीची जटील भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली. ‘समृद्धी’च्या उद्घाटनावेळी त्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते विशेष सत्कारदेखील करण्यात आला होता.
त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले. 2008 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. साखर उद्योग क्षेत्राला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. हे धडाडीचे अधिकारी या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील अशी खात्री आहे. त्यासाठी त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!
(संपादकीय कॉलम : शुगरटुडे मासिकातून)