‘एनएसआय’च्या संचालकपदी पहिल्यांदाच महिला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मिनरल वॉटरप्रमाणे उसाचा रस पेय बनवणार – डॉ. सीमा परोहा

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) संचालकपदी डॉ. सीमा परोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. १९३६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे संचालकपद आले आहे. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा!

डॉ. परोहा यांच्या कारकीर्दीचा आलेख सतत उंचावत जाणारा आहे. त्या २०१४ पासून संस्थेच्या बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख होत्या. त्यांच्यासाठी बुधवारी शर्करा सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी त्या म्हणाल्या, ‘एनएसआयची संशोधनाची परंपरा गतीने पुढे नेण्याबरोबरच संशोधन आणि विकास कार्यक्रमाला व्यावसायिक बनवण्यात येईल. गोड ज्वारीपासून इथेनॉल बनविण्याच्या संशोधनाबाबत एका बहुराष्ट्रीय कंपनीशी करार करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत संशोधनाचे काम सुरू होते. आता ते 10 एकर शेतात केले जाणार आहे. एक टन गोड ज्वारी प्रयोगशाळेत ५६ लिटर इथेनॉल तयार करू शकते.

एनएसआयला जैवइंधनासाठी उत्कृष्ट केंद्र बनवले जाईल. त्यासाठी आयआयटीच्या सहकार्याने काम करू. हे केंद्र इथेनॉल, विमान इंधन, शुगर बीट, बायो गॅस, सीएनजी इत्यादींवर काम करणार आहे, असे सांगून परोहा म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्यास आपले प्राधान्य राहणार आहे.
सध्या संस्थेत प्राध्यापकांची २७ पदे रिक्त आहेत.
उसाचा रस सर्व मोसमांमध्ये पिण्यायोग्य कसा राहील यावर काम सुरू आहे. मिनरल वॉटरप्रमाणे ते पेय म्हणून भविष्यात स्वीकारले जाईल, अशी घोषणाही डॉ. परोहा यांनी केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »