‘डॉ. तनपुरे’च्या २१ जागांसाठी १८० उमेदवारी अर्ज

राहुरी : साखर कारखाना बंद असला तरी संचालक होण्यासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जूनला मतमोजणी होणार आहे.. सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. २१ जागांसाठी आजपर्यंत १८० उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतअधिकारी किरण सावंत यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या आखाड्यात चार पॅनल उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसाधारण कोल्हार गटामधून २ जागेसाठी १३, देवळालीप्रवरा गटामधून ३ जागेसाठी १८, टाकळीमियाँ गटामधून ३ जागेसाठी २९, आरडगाव गटामधून-३ जागेसाठी २७, वांबोरी गटामधून २ जागेसाठी १७, राहुरी गटामधून २ जागेसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन प्रतिनिधी मधून १ जागेसाठी ७, अनुसूचीत जाती /अनुसूचीत जमाती प्रतिनिधीच्या १ जागेसाठी ५, महिला प्रतिनिधींच्या २ जागेसाठी १७, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधीच्या एकाजागेसाठी १८, भटक्या विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीच्या एका जागेसाठी १४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.