साखरेला द्विस्तरीय दर पद्धत लागू करा : सावंत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी सावंत यांनी केली.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) (डीएसटीए) च्या ६८ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. साखर करखानदारीच्या तांत्रिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘डीएसटीए’ने या निमित्ताने ‘शुगर एक्स्पो’चेही आयोजन केले आहे. त्यात देशभरातील कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटनही ना. सावंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयंत नाईकनवरे आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.

ना. सावंत यांनी आपल्या भाषणात साखर उद्योगाच्या आर्थिक अवस्थेवर चौफेर टोलेबाजी केली. साखरेचा घरगुती वापरापेक्षा व्यावसायिक कारणासाठीच अधिक वापर होतो. घरगुती वापराची साखर १५ रु. किलोने विकावी, त्यासाठी लेव्ही द्यायचीही आमची तयारी आहे, मात्र उरलेली व्यावसायिक वापराची साखर 7० रुपयांपेक्षा अधिक दराने विकता आली पाहिजे, असे ते म्हणाले.

व्यावसायिक कारणांसाठी ३५ रुपये किलोची साखर वापरून प्रचंड नफा कमावत आहेत. तीनशे रुपयांत तीन किलो पेढे तयार होतात, पण जेव्हा ते विकले जातात तेव्हा त्याची किंमत असते, प्रति किलो पाचशे रुपये. एकूण रक्कम झाली १५००. म्हणजे तीनशे रुपये गुंतवणूक करून नफा १२०० रुपये. इकडे साखर कारखाना काढताना काय हाल होतात माहिती आहेच ना सर्वांना, असे उद्‌गार सावंत यांनी काढले.

अधिवेशनाचा रविवारी पहिला दिवस होता, सोमवारी समारोप झाला. . उद्‌घाटन सत्राला साखर उद्योग क्षेत्रातील व्यक्तींची प्रचंड गर्दी होती. मेरियॉट हॉटेल मध्यवर्ती हॉल खचाखच भरला होता. याच कार्यक्रमात विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण श्री. सावंत यांच्या हस्ते झाले.

अध्यक्ष भड यांनी प्रस्ताविकात तानाजी सावंत यांची शिक्षण क्षेत्रातून सुरुवात ते राजकीय क्षेत्रापर्यंतच प्रवास सांगितला.
कार्यक्रमामध्ये ६८ व्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे आणि किट चे विमोचन करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »