साखर उद्योगाची दशा आणि दिशा बदलण्याची गरज : नरेंद्र मोहन
पुणे : साखर या खाद्य वस्तूबद्दल लोकांचे मत बदलले आहे, त्यामुळे साखर उद्योगाला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठी या उद्योगाची दशा आणि दिशा दोन्ही बदलावी लागणार आहे, असे आग्रही प्रतिपादन नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी केले.
साखर तंत्रज्ञान सल्ला क्षेत्रातील नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने ‘व्हेरिअस अल्टरनेटिव्हस् फॉर प्रॉडक्शन ऑफ सल्फरलेस / रिफाइंड / रॉ / फार्मा शुगर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर १ जून रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. अग्रवाल बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावरकर, उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, उत्पादन समितीचे सहसमन्वयक व्ही. एम. कुलकर्णी, तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ. दाणी, सहअध्यक्ष श्री. पाचपुते, मानद सचिव एम. आर. कुलकर्णी, संस्थेच्या कार्यकारी सचिव गौरी पवार यांची उपस्थिती होती.
एस. बी. भड यांच्या प्रास्ताविकाने पहिल्या सत्राचा प्रारंभ झाला. त्यांनी सेमिनारच्या विषयाचे महत्त्व विशद केले. प्रो. अग्रवाल पुढे म्हणाले की, साखरेकडे केवळ वस्तू किंवा कमोडिटी म्हणून न पाहता, त्याकडे ब्रँड म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे साखर उद्योगाने धोरण निश्चित करावे.
साखरेचे किती तरी उपयोग आहेत. ६० टक्के साखर उद्योगासाठी लागते, तर ४० टक्के साखर गृहापयोगासाठी लागते. उद्योगासाठी लागणाऱ्या साखरेचे, तसेच गृहोपयोगी साखरेचे वेगवेगळ्या नावाखाली ब्रँडिंग करता येऊ शकते. कच्च्या साखरेला आपण रॉ शुगर कशासाठी म्हणतो. हेल्दी शुगर म्हणा. लोक गुळाला पसंती देत आहेत. हेल्दी शुगर ब्रँड त्याची जागा घेऊ शकतो.
साखर शुद्धीकरणाची पारंपरिक सल्फिटेशन पद्धत बंद करून, सीओटू शुद्धीकरणाचा अंगीकार केला पाहिजे, यासह अनेक मौलिक सूचना प्रो. अग्रवाल यांनी केल्या. गौरी पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर शिरगावकर यांनी आभार मानले.
संस्थेच्या उत्पादन समितीचे सहसमन्वयक व्ही. एम. कुलकर्णी, निराणी समूहाचे एस. पांडा आणि नॅचरल शुगरचे यू. डी. दिवेकर या तज्ज्ञ मंडळीनी दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले.
डिफटेक टेक्नॉलॉजीजचे संजय जैन, यू. एस. जयस्वाल, सुनील अवस्थी आणि संतोष कुमार, तसेच निराणी उद्योग समूहाचे ए. पवार, सुविरॉन इक्विपमेंट्सचे चैतन्य जोशी आणि क्रेडो इम्पेक्सचे शंतनू कुलकर्णी यांनी अंतिम सत्रामध्ये मागदर्शन केले.