त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. मंत्रिसमितीची बैठक होऊन याबाबत निर्णय झाल्यानंतर सर्व साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबर पासून गाळप सुरू करावे, असे परिपत्रक साखर आयुक्तालयाने काढले होते. तसेच हा आदेश डावलणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला होता.
या पाश्वभूमीवर काही साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरच्या आधीच गळीत घेणे सुरू केले, अशा तक्रारी साखर आयुक्तालयाकडे आल्या होत्या. त्याची चौकशी केली असता, सुमारे २१ साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरपूर्वीच गाळप सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सामाधानकारक खुलासा न आल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे.
हा दंड काही लाख ते कोटींमध्येही असू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. १ नोव्हेंबरपूर्वी किती ऊस गाळप केला यावर दंडाची रक्कम निश्चित होईल. अकारण घाईमुळे अशा कारखान्यांना विनाकारण भुर्दंड बसणार आहे.
वैद्यनाथ कारखाना कसा विकला? सर्व कागदपत्रे ‘शुगरटुडे’च्या हाती. मंत्री का खोटे बोलत आहेत?
लवकरच खळबळनजक वृत्तमालिका






