इथेनॉल : मक्याचे भाव २० टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी यंदा हंगामात प्रोत्साहन दिल्याने, ऑक्टोबरच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतात मक्याच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, साखर वापरण्यावर निर्बंध घातल्यामुळे मका ‘भाव खात’ आहे. येत्या काही महिन्यांत किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
बिहारमधील गुलाबबागमध्ये मक्याचे भाव 2,366 रुपये प्रति क्विंटल आणि गुजरातमधील अहमदाबादमध्ये फीड-ग्रेड मक्याचे भाव 2,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले.
बिहारमधील बेगुसराय येथील मका व्यापारी गोपाल शर्मा म्हणाले, “येत्या काही महिन्यांत अशाचा चढ्या किमती राहतील, कारण मागणी लक्षणीय वाढणार आहे, तसेच पुढे चालून मक्याची कमतरता देखील भासू शकते.
इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत साखरेला पर्याय म्हणून मक्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. डिसेंबरमध्ये, सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस न वापरण्याचे निर्देश दिले कारण ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या 2023-24 विपणन वर्षात देशातील साखर उत्पादनात घट होण्याची अपेक्षा आहे.
कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार 2022-23 मध्ये मक्याचे उत्पादन 35.91 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. मात्र व्यापारी सूत्रांच्या दाव्यानुसार, डिस्टिलरींनी मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन सुरू केले की मागणी पूर्ण करण्यासाठी ती अपुरी पडणार आहे.
मक्याची केंद्रीय स्तरावर खरेदी करण्याच्या सरकारच्या नियोजनामुळे, शेतकऱ्यांनी इतर पिकांपासून दूर जात, मक्याची अधिक लागवड केली आहे, 12 जानेवारीपर्यंत रब्बी (हिवाळी) पेरणीदरम्यान मका क्षेत्र 20.51 लाख हेक्टरवर गेले आहे, जे गतवर्षीच्या 19.71 लाख हेक्टरच्या तुलनेत 4% ने वाढले आहे.
प्रामुख्याने कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मका पीक इतर राज्यांच्या तुलनेत अधिक घेतले जाते.
इथेनॉलची मागणी वाढल्याने, पुढील पाच वर्षांमध्ये मक्याचे उत्पादन 10 दशलक्ष टनांनी वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, याशिवाय पोल्ट्री उद्योगातही मक्याचा खाद्य म्हणून वापर होतो. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी, भविष्यात गरज भासल्या करमुक्त मका आयात करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरण्याची या क्षेत्राची योजना आहे.