माजलगावच्या ऊस उत्पादकांचा ‘वनवास’
हक्काच्या बिलासाठी तीन महिन्यांपासून प्रतीक्षा!
माजलगाव : तालुक्यातील ऊस गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असताना, ऊस उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील ‘छत्रपती साखर’, ‘सोळंके साखर’ आणि ‘जय महेश शुगर’ या तिन्ही प्रमुख कारखान्यांनी ऊसाची बिले दीड ते तीन महिन्यांपासून थकवल्याचे समोर आले आहे. यामुळे मशागत, खते आणि मजुरीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना आता सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
यंदा माजलगाव मतदारसंघात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरुवातीलाच गाळपाचे संकट ओढवले होते. त्यातच आता ऊस गाळपासाठी गेल्यानंतरही हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत छत्रपती साखर कारखान्याचे बिल ३ महिन्यांपासून, सोळंके साखर कारखान्याचे २ महिन्यांपासून तर जय महेश शुगर इंडस्ट्रीजचे बिल दीड महिन्यापासून थकीत आहे.
शेतकऱ्यांची लूट आणि दबावाचे राजकारण?
हंगामाच्या सुरुवातीला ऊस नेण्यासाठी काही कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अवाजवी शुल्क घेतल्याच्या चर्चा तालुक्यात रंगल्या होत्या. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव आणल्याचेही प्रकार घडले. आता ऊस तुटून गेल्यानंतरही बिले रखडल्याने “शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. उसाच्या लागवडीपासून ते पाणी व्यवस्थापनापर्यंत लाखो रुपये खर्च केल्यानंतर, हातात पैसे नसल्याने पुढील हंगामाची तयारी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तातडीने देयके देण्याची मागणी
शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ऊस पिकवला, मात्र कारखानदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे हक्काच्या पैशांसाठी त्यांना ताटकळत राहावे लागत आहे. जर येत्या काही दिवसांत थकीत बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत, तर शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.






