दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही अतोनात नुकसान झाले होते. यापार्श्वभूमीवर हंगाम निश्चितीसाठी येत्या दि. २५ सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार असल्याने या गळीत हंगामाला ‘दिवाळी’चा मुहूर्त लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

यंदा दिवाळीच्याच तोंडावर जरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्या, तरी त्याचा फारसा परिणाम हंगामावर होणार नाही, तसेच यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  गतवर्षी विधानसभा निवडणुका ऐन दिवाळीत आल्याने हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता. हंगाम लांबल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळल्याच्या तक्रारी आहेत, तर कारखानदारांनाही उस नेताना कसरत करावी लागली होती. याचा फटका शेतकऱ्यांना जास्त बसला होता.

साखर गळीत हंगामासाठी ३ हजार ५५० दर निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३ हजार ५५० रुपयांचा दर निश्चित केला आहे, तर त्यापुढील एक टक्क्यासाठी प्रत्येक टनाला ३४६ रुपये मिळणार आहेत. याउलट उताऱ्याचे प्रमाण कमी झाल्यास प्रतिटन ३४६ रुपये कमी होणार आहेत. मात्र, ९.५ टक्क्यांपेक्षा कमी जरी उतारा असला, तरी प्रतिटनाचा किमान दर हा ३,४६१ रुपयेच असणार आहे. यामुळे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी कारखानदारांना शेतकऱ्यांना किमान ३ हजार ४६१ रुपये द्यावे लागणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »