उसाला 5 हजार दर हवा, शेतकरी संघटनेची 9 ला परिषद

रघुनाथराव पाटील : भिगवणमध्ये ९ ऑगस्टला ऊस, दूध परिषद
सांगली : संपूर्ण कर्ज, वीजबिल मुक्ती, शेतीमालाला, दुधाला भाव, घामाला दाम मिळण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांचा हेका बदलण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस व दूध परिषदेचे आयोजन केले असून, या परिषदेसाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहनही शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथराव पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
रघुनाथराव पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध मागण्या करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, उसाला पहिला हप्ता प्रतिटन ५ हजार रुपये द्यावा, साखर व इथेनॉल कारखान्यांतील २५ कि.मी.ची हवाई अंतराची अट रद्द करावी, गाई, म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर १९८० च्या भावपातळीप्रमाणे १ लिटर डिझेल व १ लिटर पेट्रोलइतका दर मिळावा, आदी मागण्यांसाठी ही ऊस व दूध परिषद घेण्यात येणार आहे.
या ऊस व दूध परिषदेसाठी राष्ट्रीय जनहित परिषदेचे डॉ. चंद्रकांत कोलते यांच्यासह निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, अॅड. अजित काळे, अॅड. पांडुरंग रायते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बळीराजाने पिकवलेला शेतीमाल स्वस्त राहावा, यासाठी देशातील सध्याचे सत्ताधारी व पूर्वीचे सत्ताधारी यांनी उद्योगपतींना कायद्यात तरतूद करून मदत केली. अदानी, अंबानी यांना पूरक धोरण स्वीकारले. त्याचाच परिणाम होऊन शेतकरी व त्यांच्यावर अवलंबून असलेला शेतमजूर व ग्रामीण उद्योजक कर्जबाजारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही ऊस व दूध परिषद घेण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे.